मैत्रेयी पंडित-दांडेकर
एकविसावं काय, बाविसावं काय, अगदी पंचेचाळीसावं शतक येऊ दे किंवा समाज कितीही पुढारू दे, ज्या कोणाच्या आयुष्यात आई किंवा बायको आहेत त्यांना स्वतःच्या निर्णयांसाठी झटावं लागतंच! आजवरच्या माझ्या तब्बल आठ वर्षांच्या उभ्या आयुष्यात मला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा हक्क फक्त आठ महिने मिळाला.
त्यामुळे मम्माच्या पोटात असताना, तिथल्या त्या अंधाऱ्या स्वीमिंग पूलमध्ये सतत पोहून पोहून कंटाळा आल्यावर महिनाभर आधी बाहेर यायचं ‘माझं मी’च ठरवलं. हा माझ्या आयुष्यातील माझा पहिला (आणि कदाचित शेवटचा) स्वतंत्रपणे घेतलेला निर्णय!
त्यामुळे कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक बाळ आणि बाळंतिणीचा जन्म झाला आणि मग ‘वो’ म्हणजे आमच्या जीजीनं मिळेल ते विमान पकडून तडकाफडकी अमेरिका गाठली. आणि अशाप्रकारे ‘बाळ, बाळंतीण आणि वो’ या सिनेमाद्वारे आमच्या तिघींचा आपापल्या नवभूमिकेत जोरदार ‘डेब्यू’ झाला.