How Coffee Became a Fusion Drink
esakal
स्नेहल बाकरे
कॉफीनं जगभर प्रवास करत तिथल्या पद्धती स्वीकारल्या आणि त्यातून तिची अनेक नवी रूपं तयार झाली. कॅफेतलं मेनू कार्ड हातात घेतलं आणि गोल्डन टर्मरिक लाते, मोफावर, स्पाइस जिंजर लाते किंवा कार्डेमम लाते असे एखादं भारी नाव दिसलं, तर लगेच बुचकळ्यात पडू नका. आधी त्याखाली दिलेले घटक वाचा. कदाचित एखाद्या आंतरराष्ट्रीय नावाच्या कॉफीमध्ये आपल्या घरातल्या मसाल्याच्या डब्यातला एखादा जुना परिचित भेटेल...!
‘द ओन्ली कॉन्स्टंट इन लाइफ इज चेंज’ - बदल हाच जीवनातला एकमेव स्थायी नियम आहे, असं प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ हेराक्लिटस यांनी अनेक वर्षांपूर्वी सांगितलं होतं. काळ पुढे सरकत गेला तसं जग बदलत गेलं आणि त्यासोबत माणसाचं जगणंही बदललं. माणूस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागला. जगाच्या सीमा त्याच्यासाठी विस्तारत गेल्या. प्रवास जसजसा वाढला तसतशा वेगवेगळ्या संस्कृती जवळ आल्या, विचारांची देवाणघेवाण झाली आणि यातूनच विविध संस्कृतींचा एकत्रितपणे एक नवीन प्रवास सुरू झाला. विविध संस्कृती किंवा पद्धती एकमेकांमध्ये मिसळल्या, पण तरीही त्यांनी आपलं मूळ रूप कायम ठेवलं. त्यांच्या या मिलाफातून जे नव रूप तयार झालं त्यालाच आपण ‘फ्युजन’ असं म्हणू लागलो.