Premium|Gold Jewellery Future: सोन्याचे भाव असेच चढतच जाणार का? सोने आणि सोने दागिनेनिर्मितीचे भविष्य काय?

PNG Jewellers' Saurabh Gadgil: सोने दागिने बाजारपेठेचे अभ्यासक आणि पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांची विशेष मुलाखत...
gold prices interview of sourabh gadgil
gold prices interview of sourabh gadgilEsakal
Updated on

कृष्ण जोशी

सध्या सोन्याचा भाव लाखाच्या जवळपास पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सोने, सोन्याचे दागिने यांची खरेदी कमी होईल का? भाव असेच चढतच जाणार का? एकुणातच सोने आणि सोने दागिनेनिर्मितीचे भविष्य काय? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली आहेत, सोने दागिने बाजारपेठेचे अभ्यासक आणि पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांच्याकडून!

Q

दागिने उद्योगाचे भविष्य काय आहे ?

A

सौरभ गाडगीळ : सध्याचे देशातले आर्थिक वातावरण बघता आणि देशाचा होत असलेला एकंदरीत विकास बघता, लोकांचे दरडोई उत्पन्न वाढते आहे आणि कुटुंबात येणारा पैसाही वाढतो आहे. त्यामुळे येत्या पाच ते सहा वर्षांत आपले दरडोई उत्पन्न चार हजार डॉलरपर्यंत जाणे शक्य आहे; सध्या ते एक हजार डॉलरपर्यंत आहे. काही वर्षांपूर्वी चीनमध्ये तेजी आली होती, तेव्हा लोकांनी मोठ्या प्रमाणावर चैनीच्या वस्तू घेतल्या. तशीच तेजी चार-पाच वर्षांत आपल्याकडे आल्यावर लोक सोन्याचे दागिने जास्त प्रमाणात घेतील व त्यामुळे दागिनेनिर्मिती उद्योगाला मोठेच पाठबळ मिळेल. जीएसटीमुळे आता अन्य व्यवसायांप्रमाणेच या व्यवसायातूनदेखील मोठ्या प्रमाणावर कर संकलन होत आहे. त्यामुळे राष्ट्र उभारणीत या व्यवसायाचा मोठा सहभाग आहे. मात्र, दागिनेनिर्मिती क्षेत्रात हाताने केलेल्या कलाकुसरीला अजून फारसे महत्त्व प्राप्त झालेले नाही. त्सासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

Q

सध्या गल्लीबोळात दिसणारी दागिन्यांची दुकाने नव्या युगातील स्पर्धेत टिकतील का?

A

सौरभ गाडगीळ : जगात दागिने व्यावसायिकांची सर्वात जास्त संख्या भारतातच आहे. अमेरिकेत सुमारे पंचवीस हजार, तर चीनमध्ये लाखभर दागिने व्यावसायिक आहेत. भारतात लहान-मोठे, संघटित-असंघटित असे सुमारे दहा लाख दागिनेनिर्माते आहेत. या क्षेत्रात आता खूप बदल झाला आहे. पूर्वी सुरतमध्ये घरोघरी हिऱ्यांना पैलू पाडणारे कारागीर होते. छोटे सोनारही पुष्कळ होते. आता हे क्षेत्र बऱ्यापैकी संघटित झाले आहेत. तरीही अजूनही सुवर्ण व्यावसायिकांची पुष्कळ दुकाने भारतात आहेत, ती आता हळूहळू कमी होत जातील. हा आकडा येत्या काही वर्षांत ३० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.

Q

असंघटित क्षेत्र संघटित होण्यामागे काय कारण आहे?

A

सौरभ गाडगीळ : सरकारने या क्षेत्रात अनेक सुधारणा, बदल हाती घेतले आहेत, चांगले नवीन नियम केले आहेत. उदाहरणार्थ, हॉलमार्किंग, युनिक आयडी क्रमांक, जीएसटी इत्यादींमुळे हे बदल होत आहेत. सोने खरेदीदारांबरोबरच सोने व्यावसायिकांनादेखील आता हे बदल हवे आहेत. विशेषतः नव्या पिढीची ही मागणी आहे. अनेक छोटे व्यावसायिक यातून बाहेर पडतील अशी शक्यता आहे, कारण काही व्यावसायिकांना हा व्यवसाय करण्यात फार रस नाही. सरकारी बंधने पाळणेही आवश्यक आहे. त्यामुळे सध्या या क्षेत्रात ७० टक्के व्यावसायिक असंघटित आहेत; पुढील काही वर्षांत ते संघटित होतील असे वाटते. सरकारी उपाययोजनांमुळे या क्षेत्रात पारदर्शकता येईल. ही पारदर्शकता सरकारलाही हवी आहे आणि अंतिमतः ती ग्राहकांसाठी तसेच सुवर्ण व्यावसायिकांसाठीदेखील चांगलीच आहे.

Q

सरकारची ही पावले या उद्योगासाठी सकारात्मक आहेत?

A

सौरभ गाडगीळ : सरकारही या क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीने बघत आहे. सरकारने सोन्यावरील आयातकर कमी केला आहे, सोने दागिन्यांवर हॉलमार्कही अनिवार्य केले आहे. देशात विशेषतः घराघरांत सोने तसेच विनावापर पडून आहे. ते जर उपयोगात आणले गेले, तर आपली आयात कमी होईल, त्यावरील परकीय चलनाचा खर्च वाचेल व आपली परदेशी चलनाची गंगाजळीही वाढेल; त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठीच हे बदल होत आहेत. या सर्व बाबी चांगल्याच होत आहेत. संघटित क्षेत्रासाठी व्यवस्थित नियम असावेत व त्याआधारे व्यवसाय व्हावा अशीच, व्यावसायिकांसह, ग्राहक, सरकार, उद्योग या सर्वांची मागणी आहे. पुढील दोनेक वर्षांत आणखी अनेक चांगल्या कंपन्या शेअर बाजारात येतील, आयपीओदेखील आणतील. भारतात सध्या हा उद्योग ऐंशी अब्ज डॉलरच्या आसपास आहे, तो पाच वर्षांत दोनशे अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, असे वाटते.

Q

भारताबाहेर सोन्याच्या दागिन्यांचा वापर कोठे जास्त आहे ?

A

सौरभ गाडगीळ : भारताव्यतिरिक्त सोन्याचे दागिने, वस्तू यांची मोठी बाजारपेठ चीनमध्ये आहे. तिथे फेंगशुईचे प्रकार किंवा लाफिंग बुद्धा इत्यादींच्या सोन्याच्या मूर्तींना मोठी मागणी आहे. या मूर्ती २४ कॅरेट सोन्याच्या असतात. त्यांच्याकडेही दागिने असतात; पण तिथे लग्नात प्लॅटिनमचे दागिने घालतात. चिनी घरांमध्येही सोने भरपूर असते. चीनमध्ये सोन्याचा खप दरवर्षी एक हजार टन आहे. भारतात तो आठशे टनांच्या आसपास आहे, तर आखाती देशांमध्ये तो साडेतीनशे टन एवढा आहे. अर्थात भारतीय आणि चिनी दागिन्यांमधील फरक म्हणजे, चिनी दागिन्यांमध्ये फार वैविध्य नाही. त्यांचे दागिने २४ कॅरेटचे असल्यामुळे ते थोडे मऊ असतात. आपले दागिने २३ कॅरेटचे असल्यामुळे त्याच्यावर नक्षीचे बारीक काम करता येते. चीनमध्येदेखील सोने समृद्धीशी जोडलेले आहे. मात्र युरोप-अमेरिकेत आपल्यासारखी किंवा चीनसारखी सोन्याच्या दागिन्यांची मोठी क्रेझ नाही. आफ्रिकेतही सोन्याला खूप महत्त्व आहे, इराणमध्येही दागिने आढळतात, जिथे आर्थिक सुरक्षा दोलायमान असते, तिथे लोक सोने घेतात असा कल आहे. जगात दरवर्षी पाच हजार टन सोन्याची उलाढाल होते.

अमेरिका-युरोपमध्ये सोन्यापेक्षा हिऱ्यांच्या दागिन्यांना मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकेत साठ टक्के लोकांकडे हिरे आहेत, तर भारतात जेमतेम दहा टक्के लोकांकडे हिरे आहेत; अर्थात आता तरुणांमध्ये हिऱ्यांची क्रेझ वाढत आहे. चिनी सरकार तरुणांना सोन्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे आकर्षक उपाय योजत आहे. सोन्याचे कॉफी बीन घेऊन त्यांनी कॉफी जार भरून टाका, शुद्ध सोन्यामार्फत बचत करा अशा मोहिमा सरकार राबवत आहे. आखाती देशात पुरुष दागिने वापरत नाहीत, त्यामुळे तिथे सोन्याचे पेन किंवा सोन्याचे पट्टे वापरले जातात.

Q

भविष्यात सोन्याच्या किमती घटतील का?

A

सौरभ गाडगीळ : जगातील सोन्याचा पुरवठा आहे तेवढाच आहे आणि मागणी मात्र वाढली आहे, त्यामुळे सोन्याच्या किमती वाढणार हे निश्चित आहे. कोविड काळात सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ३५ हजार रुपये एवढा होता, तो आज एक लाख रुपयांच्या आसपास गेला आहे. जागतिक अस्थिरता वाढत असल्यामुळेही सोन्याच्या किमती चढ्याच राहतील. जेव्हा आर्थिक, राजकीय, सामाजिक अस्थिरता असते तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोन्याकडे वळतात. चलनवाढ झाली तरी सोने खरेदी होते. सहसा सोने कोणीही विकत नाही, फक्त खरेदीच करतात. सोन्यावर लोकांचा विश्वास असल्याने गुंतवणूक म्हणूनही सोने घेतले जाते.

Q

सोन्याच्या वापराचे ट्रेंड बदलतील का? त्यात काय नवे बदल येतील?

A

सौरभ गाडगीळ : भविष्यातील सोन्याची बाजारपेठ आणि सोन्याचा व्यवसाय यांचा विचार करता बिलावरही त्या दागिन्याचा हॉलमार्क नंबर टाकणे गरजेचे आहे. भविष्यात डिजिटल प्रिंटिंग, थ्रीडी प्रिंटिंग, लेझर प्रिंटिंग या प्रकारानेही दागिने तयार होऊ शकतील. म्हणजे त्या प्रिंटर यंत्रात सोने टाकले, की त्या यंत्रातूनच आपण सांगू तसा दागिना तयार होऊन बाहेर येऊ शकेल. त्याचप्रमाणे गोल्ड बँकिंगदेखील अस्तित्वात येऊ शकते, यात गोल्ड सेव्हिंग अकाउंटही उघडले जाऊ शकते. सोने देऊन विमा घेता येऊ शकेल. क्रेडिट कार्डावरील पेमेंटही सोन्याच्या माध्यमातून करता येऊ शकेल. अर्थात या बाबींना नियमकांची संमती गरजेची राहील. पुढील पिढीचा सोन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा राहील, हेदेखील पाहायला हवे. पूर्वी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने घ्यावे अशी धारणा असायची, मात्र आता कोविड काळानंतर नवी पिढी गुंतवणुकीबरोबरच बचत म्हणूनही सोने घेऊ लागली आहे, असे दिसून येते.

Q

आयपीओनंतरची वाटचाल कशी झाली?

A

सौरभ गाडगीळ : कर्जफेड, हेजिंग इत्यादी जी आश्वासने आयपीओपूर्वी दिली होती, त्यातील बहुतांश पूर्ण झाली आहेत. मागील वर्षअखेरीस प्रस्तावित १२पैकी ११ नव्या शाखा उघडल्या, पण नंतरच्या तिमाहीत तीन शाखा जास्त उघडल्या. आयपीओनंतर करावयाच्या सर्व बाबी व्यवस्थित झाल्या. सेबी, शेअर बाजारांना सर्व माहिती द्यावी लागत असल्याने कामात पूर्वीपेक्षाही जास्त काटेकोर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आले. आयपीओपूर्वी ३६ शाखा होत्या, त्यांची संख्या आता ५३ झाली आहे.

(कृष्ण जोशी दै. सकाळच्या मुंबई आवृत्तीमध्ये उपमुख्य वार्ताहर आहेत.)

-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com