

Ganesha in Indian Folk Culture
esakal
अमोघ वैद्य
गणेशाच्या विविध रूपांचा पट मांडताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे या देवतेची विलक्षण लवचिकता आणि सर्वसमावेशकता. गणपती कधीही कोणत्या एका कर्मठ चौकटीत किंवा ठरावीक आकाराच्या पाषाणात बंदिस्त राहिलेला नाही. लोकसंस्कृतीच्या बदलत्या प्रवाहाबरोबर तो बदलला, भक्तांच्या गरजेनुसार त्यानं नवी रूपं घेतली आणि तरीही आपलं मूळ ‘विघ्नहर्ता’ हे स्वरूप त्यानं कधी ढळू दिलं नाही.
भाद्रपदाची चाहूल लागते आणि आसमंतात एक अनामिक हुरहूर, प्रसन्नता दाटून येते. घराघरांच्या उंबरठ्यांवर काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या, बाजारातली आराशीची लगबग, मातीचा ओला सुगंध आणि वातावरणात विरघळणारा अगरबत्तीचा दरवळ या सगळ्यांमधून लाडक्या देवतेच्या आगमनाची वार्ता घराघरांत पोहोचते आणि तो म्हणजे विघ्नहर्ता गणपती. महाराष्ट्राच्या आणि एकुणातच भारतीय संस्कृतीच्या पटलावर डोकावलं, तर गणेशोत्सव केवळ एका उत्सवापुरता मर्यादित राहत नाही; तो समाजाच्या नाडीशी, इतिहासाशी आणि इथल्या लोकजीवनाशी जोडलेला एक जिवंत प्रवाह होऊन वाहतो.