Premium|Garlic Sev Recipe : कुरकुरीत शेव घरीच बनवायची? पाहा सोप्या रेसिपी

Garlic Sev and Palak Sev Recipes : दिवाळीच्या फराळासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत लसूण शेव आणि पालक शेव. बेसन, ताज्या भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून तयार करा चविष्ट शेवेचे दोन प्रकार.
Garlic Sev and Palak Sev Recipes

Garlic Sev and Palak Sev Recipes

esakal

Updated on: 

दिवाळीचा सण म्हटलं, की फराळाची लगबग सुरू होते. टिकण्यासारखे काही पदार्थ सात-आठ दिवस अगोदर करून ठेवता येतात. चिवडा, चकली, शंकरपाळी, लाडू आधीच करून हवाबंद डब्यात भरून ठेवता येतात. शेव हा त्यातलाच एक पदार्थ आहे. चला तर पाहू या शेवेचे निरनिराळे प्रकार!

लसूण शेव

साहित्य

चार वाट्या चण्याच्या डाळीचे पीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर, आठ-दहा लसूण पाकळ्या, दोन-तीन हिरव्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, तेल, मीठ.

कृती

आठ-दहा लसूण पाकळ्या, दोन-तीन हिरव्या मिरच्या व आल्याचा छोटा तुकडा हे सर्व मिक्सरमधून एकदम बारीक करून एकजीव करून घ्यावे. आता हे सर्व चण्याच्या डाळीच्या पिठात घालावे. नंतर त्यात बेकिंग पावडर व पाव चमचा तेल घालावे. सर्व एकत्र करून गरजेप्रमाणे मीठ व पाणी घालून त्याचा गोळा मळून घ्यावा व शेवपात्रात घालून तापलेल्या तेलात शेव तळून घ्यावी.

पालक शेव

साहित्य

चार वाट्या चण्याच्या डाळीचे पीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर, आठ-दहा पालकाची पाने, दोन-चार हिरव्या मिरच्या, मीठ, तेल.

कृती

सर्वप्रथम पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. अगदी थोडे पाणी घालून ही पाने दोन-तीन मिनिटे शिजवून घ्यावीत. नंतर शिजलेली पाने थोडे पाणी घालून मिक्सरमधून काढावीत. त्यातच आवडीप्रमाणे दोन-चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालाव्यात. मग हे मिश्रण चण्याच्या डाळीच्या पिठात घालावे. नंतर थोडे तेल व चवीप्रमाणे मीठ घालून गरजेप्रमाणे पाणी घालून छान घट्ट कालवून त्याचा गोळा करावा. शेवटी गोळा शेवपात्रात घालून तापलेल्या तेलात शेव तळून घ्यावी.

टोमॅटो शेव

साहित्य

चार वाट्या चण्याच्या डाळीचे पीठ, चार मोठे लाल टोमॅटो, आवडीप्रमाणे लाल तिखटाची पूड, मीठ, तेल.

कृती

टोमॅटो स्वच्छ धुवून एक मिनिटभर गरम पाण्यात ठेवावेत, यामुळे साले लगेच निघतात. साल काढून उरलेले टोमॅटो मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यावे. आता डाळीच्या पिठात टोमॅटोचा रस, आवडीप्रमाणे तिखटाची पूड व मीठ घालून मिश्रण कालवून घ्यावे. मग शेवपात्रात मिश्रण घालून गरम तेलात शेव पाडावी. लाल रंगाची खुसखुशीत शेव तयार!

Loading content, please wait...