

Hala’s Gathasaptashati & Maharashtra
esakal
भारतीय ललितवाङ्मयात गाथासप्तशतीला अग्रस्थान देण्यात येते. गाथासप्तशतीची हस्तलिखिते काश्मीर-नेपाळपासून मलबार ते तेलंगणापर्यंत जागोजागी उपलब्ध झालेली आहेत. प्राकृत जनांप्रमाणे सुसंस्कृतांवरही गाथासप्तशतीने आपला प्रभाव पाडलेला दिसतो. दुसऱ्या कोणत्याही ग्रंथातून गाथासप्तशतीतले इतके उतारे अलंकारांची उदाहरणे म्हणून साहित्यशास्त्रकारांनी उद्धृत केलेले दिसत नाहीत.
गाथासप्तशती हा महाराष्ट्रात सिद्ध झालेला व महाराष्ट्री प्राकृतातला कालानुक्रमाने आद्य व गुणमानाने अग्रगण्य ग्रंथ होय. परंतु महाराष्ट्रीय समाज, रसिक-वाचक, विद्वानांचे व संशोधकांचे या ग्रंथाकडे म्हणावे तितकेसे लक्ष गेले नाही. या पार्श्वभूमीवर शोध घेत असताना भारतीयांना गाथासप्तशतीचा पहिला स्थूल परिचय करून देण्याचे श्रेय रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांच्याकडे जाते. वसई येथील एका सद्गृहस्थाच्या संग्रही असलेल्या हस्तलिखिताचा अभ्यास करून त्यांनी ‘शालिवाहन व शालिवाहनसप्तशती’ हा निबंध मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीपुढे ता. १९ मार्च १८७३ रोजी वाचला व तो पुढे सदर संस्थेच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला. यानंतर डॉ. रामकृष्ण भांडारकरांनी मुंबई गॅझेटियर्ससाठी लिहिलेल्या अर्ली हिस्ट्री ऑफ द डेक्कन (Early History of the Deccan) या ग्रंथात या विषयाचे आणखी विवेचन केले. नारायण विष्णू बापट यांनी या ग्रंथाचे मराठीत भाषांतर (दक्खनचा (दक्षिणेचा) प्राचीन इतिहास, १८८७) केले, त्यात ते सांगतात, ‘प्राचीन महाराष्ट्रात... सप्तशती नामक ग्रंथ... पद्मरत्नावलीच्या तऱ्हेचा असून त्यात बहुतकरून शृंगारपर... पद्यांचा संग्रह आहे. आंध्रभृत्यांच्या कारकीर्दीत विद्याग्रंथकलापाची समृद्धीची स्थिती होती आणि प्राकृत भाषांचा व विशेषेकरून महाराष्ट्रीचा फार करून पहिल्यानेच लोक ग्रंथ लिहिण्याच्या कामी उपयोग करू लागले असावे असा बेधडक सिद्धांत करण्यास बाध नाही.’