स्नेहल बाकरे
भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर सतत विचार न करता किंवा भविष्यकाळात ज्या गोष्टी अजून घडल्याच नाहीत त्यावर लक्ष केंद्रित न करता वर्तमानकाळात आपण जगत असणाऱ्या क्षणांवर आपल्या सतत भरकटणाऱ्या मनाला स्थिर करणं, यालाच माइंडफुलनेस असे म्हणतात.
‘‘अगं प्रिया घरीच जायचंय ना आपल्याला? ...उजवीकडे वळायचं होतं. तू अचानक डावीकडे का वळालीस?’’
‘‘ओ नो... लक्षच नव्हतं गं माझं...’’
प्रिया व तिची आई घरापाशी येतात तोच...
‘‘अरेच्चा! मी घराची चावी बहुतेक गाडीतच विसरले...’’
‘‘प्रिया, हे काय चाललंय तुझं? आजकाल तुझं कशातच लक्ष नसतं..’’
‘‘हो गं... उद्याच्याच मीटिंगचा विचार करतीये. मला नीट जमेल ना हे प्रेझेंटेशन? नाहीतर पुन्हा मागच्या वेळेसारखी चूक नको व्हायला.’’
आजकाल प्रियाच्या बाबतीत सतत असे काही प्रसंग घडत असतात. प्रिया तशी तिशीतली, आयटी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करणारी हुशार, कुठलाही शारीरिक व मानसिक आजार नसलेली निरोगी तरुणी. पण नोकरी, घर, प्रमोशन अशा गोष्टींच्या अतिरिक्त ताणामुळे ती कशावरच लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि मग तिच्याकडून अशा क्षुल्लक चुका वारंवार होत असतात.