वर्षा गजेंद्रगडकर
शाखी पौर्णिमा तिच्या दाट, शीतल आणि जिवंत वाटणाऱ्या चांदण्यानं जशी उजळते तशीच, खरंतर थोडी अधिकच, ती ‘बुद्धपौर्णिमा’ म्हणून तेजाळते. गौतमाला बोधीज्ञान प्राप्त होऊन सगळ्या जगाला गौतम बुद्धांची देणगी मिळाली, तो हा दिवस.
बौद्ध धर्म जगभर पसरलेला असला, तरी दक्षिण आशियाई देशांमध्ये त्याची मुळं फार खोलवर रुजली आहेत. भारत ही तर गौतम बुद्धांची आणि म्हणूनच बौद्ध धर्माचीही जन्मभूमी. त्यामुळे भारतात बुद्धजयंतीचं विशेष महत्त्व आहे. गौतम बुद्धांचा जन्म, त्यांना झालेली साक्षात्कारी ज्ञानप्राप्ती आणि त्यांचं निर्वाण या सगळ्या गोष्टी वैशाखी पौर्णिमेच्याच दिवशी घडल्या.
ही पौर्णिमा सर्वांसाठीच विशेष महत्त्वाची. कारण तिने सत्य, प्रेम आणि अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा बुद्धांना जन्म दिला.