

Gen Z Loneliness
esakal
गौरी भंडारी
जेन-झीमध्ये एकटेपणाची भावना मोठ्या प्रमाणात आढळते. शॉर्ट व्हिडिओज, मेसेजिंग ॲप्स आणि सोशल प्लॅटफॉर्म्स यांमुळे वैयक्तिक संवाद कमी होऊ शकतो. परिणामी, अनेक व्यक्तींना सामाजिकदृष्ट्या जोडलेलं असूनही भावनिकदृष्ट्या एकटं वाटतं. सतत जोडलेलं असूनही वारंवार एकटेपणा जाणवण्याचा हा विरोधाभास एकूण ताणात भर घालतो.
एखादा दिवस खूप हेक्टिक गेल्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत इन्स्टाग्रामवर स्क्रोल करत जागं राहणं; समोरच्यानं मेसेजला उत्तर दिलेलं नसतानाही वारंवार व्हॉट्सॲप तपासणं; नोकरी मिळेल का याची चिंता करतानाच काही वर्षांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे त्या नोकरीत बदल होईल का, अशा पद्धतीचे विचार सतत करणं; दररोज ऑनलाइन भेटणाऱ्या लोकांशी आपला पगार, दिसणं, नातेसंबंध, प्रवास, जीवनशैली आणि यश यांची तुलना करणं; मनानं पूर्णपणे थकलेलं असतानाही ‘मी ठीक आहे,’ असं म्हणणं... ही सगळी कशाची लक्षणं आहेत? तर, ताणाची! जेन-झीचा ताण या सगळ्यातून दिसतो.
डिलॉइटच्या २०२५च्या भारतातील जेन-झी आणि मिलेनियल्सच्या सर्वेक्षणानुसार, ३३ टक्के भारतीय जेन-झींनी आपण नेहमी किंवा बहुतेक वेळा तणावग्रस्त अथवा चिंताग्रस्त असल्याचं सांगितलं. त्यांच्यामध्ये कौटुंबिक आणि वैयक्तिक नातेसंबंध, कुटुंबातील आरोग्यविषयक चिंता, मानसिक आरोग्याबद्दलची काळजी, दैनंदिन आर्थिक अडचणी आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता हे ताणाचे प्रमुख घटक होते. काम हाही ३६ टक्के व्यक्तींसाठी महत्त्वाचा ताण निर्माण करणारा घटक होता.