

Gender Equality
esakal
श्रुती भागवत
मुलगा आहे म्हणून वेगळे नियम आणि मुलगी आहे म्हणून वेगळे नियम हे अजूनही आपल्या रोजच्या आयुष्यात सहज दिसतं. पण आजची तरुण पिढी ‘हे असंच चालत आलंय’ म्हणून गप्प बसायला तयार नाहीये. त्यांना आता घरापासून नात्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीत ‘मुलगा-मुलगी’पेक्षा ‘माणूस’ म्हणून निवड करण्याचं स्वातंत्र्य हवंय.
‘मुलगी आहेस, जरा जपून हं!’... हे वाक्य अनेक मुलींनी आयुष्यात इतक्या वेळा ऐकलेलं असतं, की कधीकधी त्याचा अर्थ लावणंही त्या थांबवतात. कुठे जायचं, किती वाजता परत यायचं, काय घालायचं, कोणाशी मैत्री करायची, किती मोकळेपणानं बोलायचं... प्रत्येक गोष्टीभोवती एखादी अदृश्य रेषा आखलेली असते, आणि ती रेषा ओलांडली की काहीतरी घोडचूक केली आहे असं ठसवलं जातं. पण याच घरातला मुलगा रात्री उशिरा घरी आला, तर वातावरण वेगळं असतं. त्याला काही सूचना मिळतीलही, मात्र त्याच्या स्वातंत्र्याभोवती तितक्या सहजपणे भिंती उभ्या राहत नाहीत. ही तफावतच पितृसत्ताक समाजारचनेचा एक साधा आणि रोजच्या आयुष्यातला चेहरा आहे. पितृसत्ताक समाजरचना म्हटलं की फार मोठी आणि गंभीर संकल्पना डोळ्यांसमोर येते. प्रत्यक्षात ती अनेकदा अगदी साध्या गोष्टींतून दिसत असते. घरात कोणाला किती स्वातंत्र्य आहे, कोणावर किती बंधनं आहेत, कोणाचं मत अंतिम मानलं जातं, कोणाकडून त्यागाची अपेक्षा केली जाते आणि कोणाच्या चुका सहज माफ केल्या जातात या सगळ्यात या संकल्पनेचे पदर दिसतात. आजची तरुण पिढी मात्र या पदरांना एकेक करून उलगडून पाहत आहे. ‘हे असंच चालत आलंय’ किंवा ‘हे असंच असतं’ या एका उत्तरावर ती थांबायला तयार नाहीये.