डॉ. सदानंद मोरे
धर्म नावाची गोष्ट वैचारिक व वैज्ञानिक कसोटीच्या कक्षेत आणून युरोपातील राष्ट्रांचा पुढील प्रवास सुरू झाला. विज्ञानातील प्रगतीमुळे तंत्रज्ञानाची निर्मिती होऊ शकली आणि त्याचे पर्यवसान औद्योगिक क्रांतीत झाले. मात्र या सर्व घडामोडींचे मूळ व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून तिला विचाराचे व व्यवहाराचे स्वातंत्र्य देणे हेच होते. या स्वातंत्र्याची एक बाजू म्हणजे लोकशाही राज्यव्यवस्थेचा उदय आणि दुसरी बाजू म्हणजे भांडवलशाहीचा विकास.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागात ‘विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ हा विषय शिकवताना कार्ल पॉपरला गंभीरपणे घ्यावे लागणे हे समजून घेता येण्यासारखे आहे. ते मीही घेतले.
पॉपरचे अध्ययन-अध्यापन करताना जॉर्ज सोरोसचे संदर्भ येणार हे उघड आहे. तथापि तो गंभीरपणे घ्यावा लागण्याचा विषय आहे, याची पुरेशी जाणीव तेव्हा नव्हती.
दरम्यानच्या काळात ज्यांना उपद्व्याप म्हटले जाते अशा काही कृती सोरोस करीत राहिला. त्याच्या उपद्रवमूल्याची जाणीव रशिया, चीन इतकेच काय पण अमेरिकेलाही झाल्याशिवाय राहिली नाही. आता त्याची झळ भारतालाही लागत असल्यामुळे त्यालाही गंभीरपणे घेणे भाग आहे.