संपादकीय
सतराव्या शतकात पाश्चिमात्य कला, साहित्य, तत्त्वज्ञान, तर्क, निसर्ग, मानवता अशा मुद्द्यांना नवसंजीवनी देणाऱ्या प्रबोधन चळवळीचा केंद्रबिंदू असणारं पॅरिस हा आपल्या जगात नांदणाऱ्या अनेक जगांचाही जणू मध्यबिंदूच. ‘ला विले लुमिएर’. प्रकाशाचं शहर.
सीनकाठचं बहुरंगी पॅरिस म्हणजे फॅशन, अत्तरं, पर्यटनापासून ते अगदी दिवसाची बहुढंगी रात्र करणाऱ्या शौकिनांचीही राजधानी. पॅरिसच्या प्रेमात असणारे आणि नसणारेही पॅरिसचं एक वैशिष्ट्य मात्र मान्य करतात, पॅरिस प्रत्यही ‘पॅरिस आता पहिले उरले नाही’चा प्रत्यय देत राहतं.
गेल्या वर्षीच्या मध्यात पॅरिस चर्चेत होतं ते ऑलिंपिक खेळांमुळे. गेल्या आठवड्यात पॅरिस पुन्हा चर्चेत आलं ते नुकत्याच झालेल्या तिसऱ्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (कृबु) परिषदेमुळे. भारत या परिषदेचा सहआयोजक होता आणि यापुढच्या म्हणजे चौथ्या कृबु परिषदेचे यजमानपद भूषविण्याचीही तयारी भारताने दर्शवली आहे.