गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार

हंपी आणि बदामी या दोन्ही ठिकाणी समृद्धी, प्रगतीच्या अनेक वास्तू ठायी ठायी पाहायला मिळतात.
karnataka state hampi badami
karnataka state hampi badami sakal

हंपी आणि बदामी या दोन्ही ठिकाणी समृद्धी, प्रगतीच्या अनेक वास्तू ठायी ठायी पाहायला मिळतात. राण्यांसाठी असलेले शाही महाल, स्नानकुंड, भव्य जलाशय, कमल महाल, झरोके, छज्जे या अप्रतिम वास्तुकला आहेत. अनेक वास्तूंचा आकार, त्याचे आर्किटेक्चर आपल्याला स्तिमित करते.

कर्नाटक राज्यात असलेल्या हंपी-बदामीच्या वैभवशाली इतिहासाबद्दल शालेय पुस्तकांतून वाचलेले आठवते. या शहरांचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून युनेस्कोने या ठिकाणांना ‘जागतिक वारसा स्थळा’चा दर्जाही दिलेला आहे. भारतीय पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटकांचाही नेहमीच या दोन्ही ठिकाणांकडे ओघ असतो.

शेकडो वर्षांपूर्वीच्या गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा हंपीमध्ये पदोपदी दिसतात. तिथल्या वास्तूंचे काही भग्नावशेष तर आजही चिरंजीव भासतात. कर्नाटक शासनाने मूळ वास्तूला धक्का न लावता काही स्थळांची डागडुजी केली आहे आणि त्यांच्या मूळ सौंदर्यात भर घातली आहे. हे अवशेष पाहताना त्या ऐश्वर्यसंपन्न आणि काळाच्या कितीतरी पुढे असलेल्या सम्राट कृष्णदेवराय आणि त्याच्या वंशजांपुढे आपण नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही.

karnataka state hampi badami
Pune ZP CEO : रमेश चव्हाण पुणे झेडपीचे नवे सीईओ; आयुष प्रसाद यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

तेथील स्थानिक टुरिस्ट गाइड सांगतात, की रोम शहराव्यतिरिक्त इतक्या पुरातन वास्तू जगात अन्यत्र नाहीत. दरवर्षी ऑगस्ट ते मार्चपर्यंत देशातून, जगातून हजारो पर्यटक या स्थळांना भेटी देत असतात.येथील वास्तू गतकालीन वैभवाची साक्ष देत उभ्या आहेत, ते पाहून आपले मन भूतकाळात गेल्याशिवाय राहत नाही.

हंपी हे कृष्णदेवरायाच्या विजयानगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर. १८००च्या दशकात ईस्ट इंडिया कंपनीतील लष्कर अधिकारी आणि भारताच्या पहिल्या सर्व्हेअर जनरल असलेल्या कर्नल कॉलिन मॅकेन्झीने विस्मृतीत गेलेले हे शहर प्रकाशात आणले.

हंपीला अनेक मंदिरे, त्या मंदिरांची गोपुरे (यावर तर स्वतंत्र लेख होईल), त्यातील पुरातन मूर्ती, कलाकुसर व नक्षीकाम केलेल्या शिल्पांसह अनेक तळघरे, राण्यांचे महाल, पाण्याचे उत्तुंग जलाशय, शाही मंडप, चबुतरे, राजकोष, दरबार अशा अनेक वास्तू आहेत - यातल्या काही सुस्थितीत आहेत, तर काहींचे भग्नावशेष आढळून येतात.

हंपी येथील विठ्ठल मंदिराला आवर्जून भेट द्यावी. सुंदर, सुबक, देखणे आणि भव्य असे मंदिर आहे. द्रविडी वास्तुशिल्पकलेचा वापर करून बांधलेल्या या विठ्ठल मंदिरावरील नक्षीकाम डोळे दिपवून टाकणारे आहे. विरूपाक्ष मंदिरही असेच देखणे आहे. विठ्ठल मंदिरातील छपन्न खांबांवर विलोभनीय कलाकुसर आहे. या खांबांवर टिचकी मारल्यास त्यातून विविध ध्वनी ऐकू येतात.

या मंदिरातील हॉलच्या पूर्व दिशेस एक प्रसिद्ध शिळारथ आहे, त्याला दगडाची चाके आहेत. हा रथ आपल्याला पन्नास रुपयांच्या नोटेवर पाहायला मिळतो. इथे लक्ष्मीनरसिंहाचेही मंदिर आहे. मंदिरातील नरसिंहाची मूर्ती अनंत नागावर बसलेली आहे.हंपी आणि बदामी या दोन्ही ठिकाणी अशा अनेक वास्तू ठायी ठायी पाहायला मिळतात.

राण्यांसाठी असलेले शाही महाल, स्नानकुंड, भव्य जलाशय, कमल महाल, झरोके, छज्जे या अप्रतिम वास्तुकला आहेत. राण्यांना ऊन, हवा, सूर्यप्रकाश मिळावा, पण त्याचवेळी इतरांना राण्यांचे दर्शन होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली गेली होती. अनेक वास्तूंचा आकार, त्याचे आर्किटेक्चर आपल्याला स्तिमित करते. काही वास्तू भूमितीय आकारात दिसतात.

अनेक शिल्पांवर काही मंत्र, काही शिलालेख आढळून येतात. हत्ती, घोडदळ, शस्त्रास्त्रे ठेवण्यासाठी मोठाले कक्ष उभारले गेले होते. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ अतिशय भक्कम तटबंदी आहे.

पण अतिशय द्रष्टा, दयाळू अशी ख्याती असलेल्या सम्राट कृष्णदेवराय याची राजधानी असलेल्या हंपी नगरीवर मोगलांनी अनेकदा आक्रमण करून नासधूस केल्याने राजाचा दरबार, न्यायनिवाडा होत असे तो भव्य दरबार, शाही रत्नजडित सिंहासन, मनोरंजन कक्ष आज अस्तित्वात नाहीत, पण त्यांचे अवशेष मात्र दिसतात.

अजूनही इतिहास संशोधकांना, पुरातत्त्व विभागाला हंपी-बदामीमधून उत्खननात अनेक वस्तू, भग्न इमारतींचे अवशेष सापडतात. या प्रांतात सहाशेपेक्षा अधिक मंदिरे असतील. हंपीच्या आजूबाजूला असलेले ग्रॅनाईटचे पहाड, त्यांचे विविध आकार आपल्याला थक्क करतात. काही पहाड तर अधांतरी असल्यासारखे दिसतात.

karnataka state hampi badami
Solapur : वाळूवरील कारवाई रोखण्यासाठी मागीतली लाच; तलाठी व ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

हे सगळे ग्रॅनाईटचे पहाड जगातील सगळ्यात जुने पाषाण आहेत. त्या काळात हंपी-बदामीमध्ये सुमारे पाच लाख लोक राहत असत. हिऱ्यांच्या-सुवर्ण जवाहिरांच्या व्यापारापासून कापडापर्यंत अनेक वस्तूंच्या व्यापारात ही नगरी आघाडीवर होती. म्हणूनच त्या काळातल्या अतिशय संपन्न अशा व्यापार केंद्रात या शहरांची गणना होत असे, असे तिथल्या गाइडने सांगितले.

हंपीला भेट दिल्यावर तिथले वस्तू संग्रहालय आवर्जून पाहावे. उत्खननात सापडलेली अनेक कोरीव शिल्पे, तोफा, भांडी, हत्यारे, मातीची भांडी, पुरातन नाणी, देवदेवतांच्या मूर्ती -काही अभंग तर काही भग्नावस्थेतल्या -संग्रहालयात पाहण्यास मिळतात. याच परिसराचा फेरफटका मारत असताना तुंगभद्रा धरणाला अवश्य भेट देऊन त्याचे सौंदर्यही डोळ्यात साठवून घ्यावे.

हंपी-बदामी ही एेतिहासिक शहरे एकमेकांना लागून आहेत. इथे भारतभरातून पर्यटक येत असतात. मुंबईहून हंपी-बदामीला जाण्यासाठी दादर किंवा सीएसटी येथून ट्रेनने विजयपूर (पूर्वीचे विजापूर किंवा बिजापूर) येथे उतरावे आणि तेथून रस्‍त्याने हंपीला जाता येते. हंपीला जाण्यासाठी हंपीपासून सगळ्यात निकटचे स्थानक होस्पेट हे जंक्शन आहे.

रस्ताही उत्तम आहे हे विशेष. हंपी-बदामी, विजयनगर इथे सर्वत्र शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोय आहे. इडली, डोसा, मेदूवडा यासह चायनीज, पंजाबी पदार्थसुद्धा सहज मिळतात, त्यामुळे पर्यटकांची कुठेही गैरसोय होत नाही.आम्ही विजयपूरलाही भेट दिली. विजयपूरमधील अतिशय प्रसिद्ध स्थळ म्हणजे गोलघुमट - मुहम्मद आदिलशहाची कबर.

karnataka state hampi badami
Akola Kickboxing Championship : अकोल्यातील किकबाॅक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धा उत्साहात संपन्न

ह्या भव्यदिव्य ऐतिहासिक वास्तूचा आकार गोल घुमटासारखा असल्याने या वास्तूला गोलघुमट असे नाव पडले.

गोलघुमटचे बांधकाम आदिलशाहच्या हयातीतच सुरू झाले होते. पण काम सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आणि या इमारतीचे काम अर्धवट राहिले. पुढे इथेच आदिलशहाची कबर बांधण्यात आली. खालच्या दालनात चबुतऱ्यावर मुहम्मद आदिलशाह, त्याच्या दोन बेगमा, रंभावती (वारांगना), मुलगी व नातू यांची थडगी आहेत.

विजयपूर शहराच्या ईशान्येला गोलघुमट आहे. गोलघुमट फार लांबूनही दृष्टीस पडतो. गोलघुमटाची उंची २२३ फूट असली तरी घुमटावरील ताज यात अंतर्भूत केल्यास घुमटाची उंची २५० फूट होते. गोलघुमटाच्या चारही बाजूंनी चार मनोरे आहेत. मनोऱ्याच्या सहाव्या मजल्यास लागून वर्तुळाकार सज्जा आहे.

घुमटाभोवती असलेल्या मनोऱ्यांना प्रत्येकी आठ मजले आहेत. या ऐतिहासिक आणि कलात्मक वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे घुमटाच्या एका बाजूला बोलल्यास किंवा टाळी वगैरे वाजवल्यास घुमटाच्या दुसऱ्या टोकाला त्याचा स्पष्ट आवाज येतो आणि अचंबित व्हायला होते.

karnataka state hampi badami
Pune : देवाच्या आळंदीमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याची साथ; शाळा बंद ठेवण्याच आवाहन

विशेष म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर १३० फूट आहे. गोलघुमट भारतातील सर्वात मोठा घुमट असून घुमटाखालच्या दालनात मारलेली हाक दुसऱ्या टोकास ऐकू तर येतेच, पण आपली हाक किमान पाच ते सहा वेळा घुमते. असा आवाज घुमतो म्हणून याला ‘बोल घुमट’ असेही म्हणतात. अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असा हा गोलघुमट मध्ययुगीन स्थापत्यशैलीचा आश्चर्यकारक नमुना मानला जातो.

बदामी येथे वास्तव्यास असताना एका जर्मन दाम्पत्याची भेट झाली. सत्तरी पार केलेल्या या दाम्पत्याने अनेक वेळा जगभ्रमंती केली आहे. भारतात ते चौथ्यांदा येत होते. हंपी-बदामी या ऐतिहासिक शहरांबद्दल त्यांना विलक्षण कुतूहल असल्याने यावेळी ते बदामी-हंपीला आले होते. पुण्याचा शनिवारवाडा, मुंबईतील घारापुरी-कान्हेरी लेणीसुद्धा त्यांनी पाहिल्या आहेत. त्यांनी

आम्हाला सांगितले, ‘या पर्यटन स्थळांना भेट देताना एक जाणवलं. इथं वेगळंच चैतन्य आहे. माणुसकी, भावनेचा ओलावा, सहकार्याची भावना आणि प्रेम हे आम्हाला फक्त भारतात दिसलं आणि म्हणूनच आम्ही भारतात चार वेळा आलो आहोत, आणि पुन्हा पुन्हा येऊ!’

या दाम्पत्याने आपल्या देशाबद्दल काढलेले हे गौरवोद्‍गार, हंपी-बदामी शहरांच्या भेटीला एक आगळाच सुगंध देऊन गेली!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com