

GLP-1 Weight Loss Drugs
esakal
डॉ. प्रणिता अशोक
जीएलपी-१ रिसेप्टर औषधे म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक शक्तिशाली शस्त्र नक्कीच आहे, परंतु ते अज्ञानाने वापरल्यास, ती एक दुधारी तलवार ठरू शकते. ‘वजन कमी होणे’ आणि ‘निरोगी होणे’ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्नायू आणि पोषण यांच्याकडे दुर्लक्ष करून कमी केलेले वजन शरीराला अपंगत्वाकडे नेऊ शकते.
आज जागतिक स्तरावर लठ्ठपणा आणि अनियंत्रित मधुमेह या समस्यांवर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात एका नवीन क्रांतीची चर्चा आहे, ती म्हणजे जीएलपी-१ रिसेप्टर अॅगनिस्ट (GLP-1 Receptor Agonists) गटातील औषधे. सध्या या औषधांनी जगभरातील वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हॉलिवूडच्या कलाकारांपासून ते गल्लीबोळातील सामान्यांपर्यंत या औषधांची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. परंतु, ही औषधे जितक्या वेगाने वजन कमी करतात, तितक्याच वेगाने ती शरीरातील महत्त्वाच्या पोषणमूल्यांचा आणि स्नायूंचा ऱ्हास करतात, या वास्तवाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. या औषधांच्या वापरामागील वैद्यकीय विज्ञान, त्यांचे दुष्परिणाम, त्यांच्यामुळे शरीराची होणारी हानी आणि योग्य पोषणाचे महत्त्व समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.