प्रसाद नामजोशी
या पृथ्वीतलावर जेम्स बॉन्ड काहीही करू शकतो आणि बॉन्डपटाची निर्मिती होण्यासाठी कुठलंही निमित्त पुरेसं ठरू शकतं. इऑन फिल्म्सनिर्मित आठ बॉन्डपट यशस्वी झाले असताना मंडळी आता नवव्या कथेच्या शोधात होती. त्याच सुमारास, म्हणजे १९७३ मध्ये जगभर ‘ऑइल क्रायसिस’ निर्माण झाला होता. त्याचं झालं असं होतं, की त्यावर्षी अरब राष्ट्रं आणि इस्राईल यांच्यात एक युद्ध झालं.
६ ते २५ ऑक्टोबर या काळामध्ये झालेला इजिप्त आणि सीरियाविरुद्ध इस्राईल असा तो झगडा होता. त्याला योम कीप्पूरचं युद्ध किंवा रमादान युद्ध असं नाव आहे. युद्धाचं कारण काही का असेना, पण ‘इस्राईलला मदत करणाऱ्या सर्व राष्ट्रांना आम्ही तेल देणार नाही’ असा निर्णय ‘ओपेक’नं घेतला.