

R Vaishali wins FIDE Candidates in Cyprus to earn shot at Women’s World Championship
esakal
वैशाली आक्रमक शैलीतील खेळासाठी ओळखली जाते. सायप्रसमध्ये तिने एकाग्रतेसह खंबीर मानसिकतेचेही प्रदर्शन घडविले. चौदा फेऱ्यांच्या स्पर्धेत सुरुवातीस ओळीने चार डाव बरोबरीत राखल्यानंतर वैशालीला चीनच्या झू जिनर हिच्याकडून पाचव्या फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यातून सावरत या धाडसी खेळाडूने जबरदस्त मुसंडी मारली.
सायप्रसमध्ये झालेल्या फिडे कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेतील महिला गटात भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीला विजेतेपदासाठी कमीच पसंती होती. स्पर्धेतील आठ महिला बुद्धिबळपटूंत तिचे मानांकनही तुलनेत खालीच होते. स्पर्धेतील अन्य दोन भारतीय महिलांपैकी कोनेरू हम्पीने माघार घेतली. महिला विश्वकरंडक विजेती दिव्या देशमुख कँडिडेट्स किताबही पटकावणार का, याची उत्सुकता होती. एकूण १४ फेऱ्यांच्या या बौद्धिक कस पाहणाऱ्या स्पर्धेत अखेर भारतीय महिलाच विजेती ठरली. २४वर्षीय तमिळनाडूच्या वैशालीने सर्वाधिक साडेआठ गुणांसह बाजी मारली आणि महिला विश्वविजेतेपदावर दावा सांगितला. बुद्धिबळातील या सर्वांत मोठ्या बक्षिसासाठी वैशाली याच वर्षी चीनची पाच वेळची जगज्जेती ३५वर्षीय जू वेनजून हिला आव्हान देईल.