

Parents' Struggles and Memories
esakal
मुलांनी लहानपणी पाहिलेले आई-वडील असतात ते सगळ्या संकटांचं निवारण करणारे, पटकन खिशातून पैसे काढून देणारे असे परीकथेतल्या पालकांसारखे असतात. त्यांना माणूस म्हणून काय अडचणी आल्या असतील, त्यांना काय संघर्ष करावे लागले असतील याचा विचारही आपण लहानपणी फारसा केलेला नसतो. आई-वडिलांनी लिहिलेल्या आठवणी वाचताना मुलांनासुद्धा ‘बाळपणीचा काळ सुखाचा’ या पडद्यामागचे खरे सूत्रधार दिसतात.
गोष्ट आहे पुण्याच्या एका आजीची. आता तिला आजी म्हणावं, तर ती आहे चांगलीच टुणटुणीत, सुविद्य आणि इंग्रजीची प्राध्यापिका. उन्हाळी सुट्टीत मुलीकडे अमेरिकेत आलेली. शाळेतल्या आजी-आजोबा दिवसानिमित्त आपल्या ‘इंडिया’तून आलेल्या आजीला घेऊन नात ऋचा शाळेत गेली. प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेनं या स्पेशल ‘इंडिया आजी’चं पंधरा मिनिटांचं भाषण ठेवलं, तेव्हा आजीनं तिच्या लहानपणीच्या भरपूर आठवणी सांगितल्या. तेव्हा मुलंच काय, तर कार्यक्रमाला आलेले आजी-आजोबासुद्धा रंगून गेले. भाषण ऐकताना नातीच्या आणि इतर मुलांच्या डोळ्यात जो आनंद दिसला, तो पाहून आजीला वाटलं, आपल्याजवळ नातवंडांना देण्यासारखा हाच खरा ठेवा आहे. आजीशी बोलताना हा विषय निघाला आणि हा ठेवा नातवंडांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काय केलं ते याच सदराच्या तिसऱ्या लेखात (निवृत्तीनंतरचा एकशे एकावा मार्ग, ता. २४ जानेवारी) लिहिलं होतं बघा! म्हणून इथं त्याची पुनरुक्ती करत नाही.