गुकेशचे अचाट बुद्धिचातुर्य

Gukesh D India Youngest Chess Grandmaster
Gukesh D India Youngest Chess Grandmaster

विश्वनाथन आनंदनंतर देशाला पुन्हा जगज्जेता मिळणे ही घटना भारतीय बुद्धिबळासाठी अनन्यसाधारण असेल. युवा बुद्धिबळपटू डी. गुकेशची स्वप्ने उत्तुंग आहेत.

एकाग्रपणे त्याची वाटचाल सुरू आहे. २७५०नंतर २८०० एलो गुण, बुद्धिबळातील जगज्जेता आव्हानवीराची स्पर्धा आणि एकदिवस स्वतः जगज्जेता... गुकेश दृढनिश्चयाने पुढे जात आहे.

भारताचा महान बुद्धिबळ ग्रँडमास्टर, पाच वेळचा माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद याने देशातील बुद्धिबळाला आश्वासक, प्रगतशील दिशा दाखविली, ज्यावरून मार्गाक्रमण करत कितीतरी भारतीय कीर्तिवान झाले. आनंदचे केवळ देशातीलच नव्हे, तर जागतिक बुद्धिबळातील योगदान अद्वितीय, अत्युच्च आहे.

आनंद हा भारतीय बुद्धिबळातील अग्रेसर क्रांतिकारी! जागतिक बुद्धिबळ पटावर झंझावात निर्माण करण्यापूर्वी आनंदला खूप कष्ट उपसावे लागले, त्यामुळेच त्याची अजोड कामगिरी देशातील नवोदितांसाठी प्रेरणास्रोत ठरली.

कितीतरी लहान मुलं भविष्यातील ‘आनंद’ होण्याचे स्वप्ने पाहत बुद्धिबळ खेळू लागली. खडतर परिश्रम घेणारे यशस्वी ठरले. त्यापैकीत एक कोवळं नाव म्हणजे डोम्मराजू गुकेश... डी. गुकेश.

डी. गुकेश हा जागतिक बुद्धिबळातील प्रतिष्ठेच्या एलो (Elo)मानांकनात २७५० गुणांचा टप्पा गाठणारा सर्वांत युवा बुद्धिबळपटू. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाच्या पार्श्वभूमीवर गुकेशने तुर्किएतील सुपर लीग स्पर्धेच्या शेवटच्या डावात ग्रँडमास्टर क्लेमेन्टी सिचेवला नमवून लाईव्ह रेटिंगमध्ये २७५० एलो गुणांचा टप्पा गाठला, तेव्हा तो १७ वर्षे एक महिना व २१ दिवसांचा होता.

जगातील अव्वल मानांकित बुद्धिबळपटू माजी जगज्जेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनचा विश्वविक्रम गुकेशने दोन महिन्यांच्या फरकाने मोडला.

जागतिक बुद्धिबळ महासंघ, फिडेच्या ताज्या यादीत गुकेश झळकला, तेव्हा चेन्नईचा हा दैवी गुणवत्तेचा बुद्धिबळपटू १७ वर्षे, दोन महिने व तीन दिवसांचा होता. कार्लसनच्या २७५० एलो गुणांवर मोहोर उठली तेव्हा तो १७ वर्षे, चार महिने व तीन दिवसांचा होता. गुकेशचा हा पराक्रम समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.

बुद्धिबळ पटावरील आक्रमकता आणि कल्पकतेच्या बळावर गुकेशने अगदी लहान वयातच विस्मयजनक अशी उत्तुंग झेप घेतली. जानेवारी २०१९मध्ये तो ग्रँडमास्टर झाला, तेव्हा १२ वर्षे, सात महिने व १७ दिवसांचा होता. युक्रेनच्या सर्जी कर्जाकिनचा तेव्हाचा विश्वविक्रम मोडण्यासाठी त्याला १७ दिवस कमी पडले.

जून २०२१मध्ये भारतीय वंशाचा अमेरिकी बुद्धिबळपटू अभिमन्यू मिश्राने मोठी झेप घेताना १२ वर्षे, चार महिने व २५ दिवसांचा असताना सर्वांत कमी वयाचा ग्रँडमास्टर होण्याचा पराक्रम साधला ही बाब वेगळी. कमी वयात ग्रँडमास्टर झालेला गुकेश तेवढ्यावरच समाधानी राहिला नाही, त्याची भूक फार मोठी आहे.

आता जगज्जेता होण्यासाठी तो जागतिक पटावर बुद्धिचातुर्य खुबीने वापरताना दिसत आहे. गतवर्षी चेन्नईजवळील मामल्लापुरम येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये गुकेशने कमाल केली.

भारताच्या पुरुष-२ व महिला संघाला ऐतिहासिक ब्राँझपदक मिळाले. पुरुष संघाच्या गुकेशने साऱ्यांना स्तिमित करताना सर्व आठही गुण जिंकून बोर्ड एकवरील सर्वोत्तम खेळाडूचे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले, तेव्हा त्याचे खूप कौतुक झाले.

विश्वनाथन आनंदचे अग्रस्थान धोक्यात

माजी जगज्जेता ५३ वर्षीय विश्वनाथन आनंद भारताचा निर्विवाद क्रमांक एकचा बुद्धिबळपटू आहे. जुलै १९८६पासून सलग साडेतीन दशके त्याने अग्रस्थान टिकवून ठेवले आहे. मध्यंतरी २०१६मध्ये लाईव्ह रेटिंगमध्ये पेंटाला हरिकृष्ण भारताचा अव्वल मानांकित ठरला होता, पण फिडेच्या क्रमवारीत आनंदला मागे टाकणे त्याला शक्य झाले नव्हते. जुलै २०२३च्या फिडे मानांकनात आनंद २७५४ एलो गुणांसह जगात नवव्या स्थानी होता. ऑगस्ट २०२३मधील यादीत आनंद आणि गुकेश यांच्यातील अंतर कमी झाले आहे. लाईव्ह रेटिंगमध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आनंदच्या तुलनेत ३.१ लाईव्ह रेटिंग गुणांचा फरक होता. भविष्यात गुकेश आनंदला मागे टाकू शकतो, असे बुद्धिबळातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गुकेशचा अचाट धडाका पाहता एका योग्य खेळाडूने आपल्याला मागे टाकल्याचे पाहून आनंदही खूश असेल. गुकेशने अल्पावधीत भरपूर प्रगती साधली आहे. ऑक्टोबर २०१७मध्ये त्याने इंटरनॅशनल मास्टरचा (आयएम) पहिला नॉर्म मिळविला.

जानेवारी २०१९मध्ये त्याने ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक असलेल्या अखेरच्या नॉर्मची पूर्तता केली. या कालावधीत तो जगभरात तब्बल २७९ डाव खेळला व १८९ एलो गुणांची प्राप्ती केली. अथक, अविश्रांत बुद्धिबळ खेळत गुकेशने ग्रँडमास्टर होण्याची पहिली स्वप्नपूर्ती केली.

गुकेशचा समकालीन भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन इरिगैसीने २७०० एलो गुणांचा टप्पा ओलांडलेला आहे. आणखी एक भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीचे जुलैमध्ये २७१९ एलो गुण होते. मध्यंतरी आर. प्रग्नानंदनेही २७०० एलो गुणांचा टप्पा ओलांडला होता.

गुकेश तुलनेत भन्नाट ठरला. सध्या भारतीय बुद्धिबळपटूंत द्वितीय स्थानी असलेला हा असामान्य बुद्धिमत्तेचा खेळाडू काही महिन्यांत आनंदला दुसऱ्या स्थानी ढकलू शकतो. आपण हा पराक्रम साध्य करू शकतो याची जाणीव गुकेशला आहे, पण त्याचे पाय जमिनीवरच आहेत.

आनंद माझा आदर्श आहे, तोच माझ्यासाठी मोठा हिरो आहे असे तो प्रत्येकवेळी नम्रतेने सांगतो. आनंदने साध्य केलेल्या महान उपलब्धींसमोर आपण कोठेच नाही असे शांतपणे, प्रामाणिक स्वरात सांगणाऱ्या गुकेशच्या प्रत्येक शब्दातून आनंदप्रती आदरभाव प्रकट होतो.

अपार कष्टाची जोड

गतवर्षी ऑक्टोबरमध्ये गुकेशने जागतिक अव्वल बुद्धिबळपटू कार्लसनला पराभूत केले, तेव्हा तो अशी कामगिरी करणारा जगातील सर्वांत युवा ठरला. मात्र गुकेश भारावून गेला नाही. त्याची वाटचाल ध्येयप्राप्तीच्या दिशेने कायम राहिली. जागतिक मानांकनात २८००पेक्षा जास्त एलो गुण असलेला कार्लसन एकमेव आहे.

फ्रान्सचा ग्रँडमास्टर अलीरेझा फिरौझाने १८ वर्षे व पाच महिने वयाचा असताना २८०० एलो गुण गाठताना सर्वांत तरुण बुद्धिबळपटू हा मान मिळविला होता, नंतर त्याचे मानांकन घसरले. गुकेशलाही हा जादुई गुणांचा टप्पा खुणावत आहे.

२५०० ते २७५० या गुणांच्या प्रवासासाठी त्याला ५४ महिने लागले. ते लक्ष्य साध्य केल्यानंतर जगज्जेतेपदासाठी आव्हानवीर होण्याचे त्याचे पुढील उद्दिष्ट आहे. १७ वर्षीय गुकेशला यश सहजासहजी मिळालेले नाही, त्यासाठी अपार कष्ट उपसावे लागले.

बुद्धिबळाला वाहून घेतलेल्या चेन्नईचा हा मुलगा इयत्ता चौथीनंतर शाळेतही नियमितपणे गेला नाही. वडील रजनीकांत सर्जन. त्यांनी मुलाच्या गुणवत्तेला खतपाणी घालताना मोठा त्याग केला, वैद्यकीय पेशा बाजूला ठेवला. ध्येयाने पछाडलेली पिता-पुत्राची जोडी जगभ्रमणावर निघाली.

केवळ भारतातच खेळून कमी वेळेत ग्रँडमास्टर होणे शक्य नव्हते. गुकेशला वडिलांचे भरीव प्रोत्साहन, पाठबळ होतेच, वेळप्रसंगी नातेवाईक, हितचिंतकांनीही हातभार लावला, पण आर्थिक समस्या उद्‍भवत होत्याच. परिणामी काही वेळा विमानतळावरच रात्र घालविणे क्रमप्राप्त ठरले.

वडिलांना वाईट वाटत होते, परंतु मुलाची प्रतिभा त्यांना नवी प्रेरणा देत होती. केवळ गुकेशच्याच नव्हे, रजनीकांत यांच्याही मेहनतीला गोड फळ आले आहे. भविष्यात हा देदीप्यमान बुद्धिबळपटू जगज्जेता झाल्यास नवल वाटू नये.

आपला आदर्श विश्वनाथन आनंद याच्यासाठी त्याची ती अनोखी मानवंदना असेल. आनंदनंतर देशाला पुन्हा जगज्जेता मिळणे ही घटना भारतीय बुद्धिबळासाठी अनन्यसाधारण असेल.

गुकेशची स्वप्ने उत्तुंग आहेत. एकाग्रपणे त्याची वाटचाल सुरू आहे. २७५०नंतर २८०० एलो गुण, बुद्धिबळातील जगज्जेता आव्हानवीराची स्पर्धा आणि एकदिवस स्वतः जगज्जेता... गुकेश दृढनिश्चयाने पुढे जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com