Premium|Guru Purnima : नव्या युगाची नवी गुरुपौर्णिमा...

Guru Disciple Relationship : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बदलत्या काळात गुरू-शिष्य नात्याचा अर्थ, श्रद्धेचे स्थान, ज्ञानाची परंपरा आणि आधुनिक जीवनात गुरूचे बदलते स्वरूप यांचा संवेदनशील वेध.
Guru Disciple Relationship

Guru Disciple Relationship

esakal

Updated on

अरुण म्हात्रे

पूर्वी गुरू म्हटलं, की शाळा-कॉलेजमधले शिक्षक हेच आपले मार्गदर्शक, मेंटॉर, सल्लागार आणि तत्त्वचिंतक असायचे. त्याउलट आता आपण ज्या ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातला व्यासंगी, अनुभवी, अभ्यासू आणि दयाळू असा माणूस आपल्याला गुरू म्हणून लाभतो किंवा आपण त्याला गुरू म्हणून मान्यता देत असतो...

एकीकडे जग खूप वेगानं बदलत चाललं आहे असं आपण म्हणतो, आणि दुसरीकडे सर्व जुन्या पारंपरिक गोष्टी आपण आवडीनं जपतो. एकेकाळी गुरू असलेल्या व्यक्तीचं महत्त्व आणि त्यानिमित्तानं गुरुपौर्णिमेच्या सणाचं महत्त्व आपल्यासाठी श्रद्धेची गोष्ट होती. अगदी शाळेतले शिक्षक ज्यांना आपण ‘मास्तर’ म्हणायचो, त्यांच्याविषयी आपल्या मनात प्रचंड आदरभाव असायचा, अर्थात तो अजूनही आहे. ज्यांना आपण मनोमन गुरू किंवा शिक्षक मानतो, त्यांच्या ठायी आपण सहजच नतमस्तक होतो. इथं ‘श्रद्धा’ नावाच्या गोष्टीचा उगम होतो. ज्याच्याविषयी श्रद्धा असते, त्या व्यक्तीला आपण संपूर्णतः शरण जातो. अशी श्रद्धा तुमच्यामध्ये निर्माण करणाऱ्या व्यक्तीनं आपल्या ज्ञानानं, व्यासंगानं, बुद्धिचातुर्यानं आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलेलं असतं. तुमच्यासाठी ती अत्यंत आदरार्थी व्यक्ती असते, कारण तिच्याकडे जे ज्ञान आहे ते आपल्यापाशी नाही ही आपली पक्की धारणा असते. अशा व्यक्तींना गुरू मानायला आपली जराही हरकत नसते. किंबहुना, अशा व्यक्तींना जेव्हा आपण गुरुस्थानी मानतो, तेव्हा मात्र गुरूचं महत्त्व, त्याची आपल्या जीवनातली अपरिहार्यता, त्याचं आपल्या जगण्यातलं अढळ स्थान आणि कुठल्याही अडचणीच्यावेळी ते आपल्या पाठीशी आहेत, ही भावना त्यांच्या बाबतीत पक्की होत जाते. त्यांच्याविषयी आपण एक विश्‍वास बाळगून असतो. ते काही कमर्शिअल नातं नसतं. ते हृदयाचं नातं असतं, आणि या अंतस्थ नात्यातूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा काही महत्त्वाच्या सणांना आपण गुरूची पूजा करतो, गुरूला दक्षिणा म्हणून काही देतो किंवा कुठल्यातरी प्रकारे आपलं शिष्यत्व व्यक्त करतो, मान्य करतो. गुरूच्या पायी नतमस्तक होणं हा आपल्या संस्काराचा भाग होऊन जातो. भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये अजूनही काही सुंदर भावना जपणाऱ्या प्रथा शिल्लक आहेत, त्यात केवळ विशिष्ट दिवशी नव्हे, तर इतर वेळीही आपल्याला वंदनीय वाटणाऱ्या व्यक्तीच्या पायी डोकं ठेवावं असा एक संस्कार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com