

Guru Shishya Tradition
esakal
प्राजक्ता माळी
आयुष्यात सजग राहणं खूप महत्त्वाचं आहे. सद्सद्विवेकबुद्धी जागरूक असणं खूप महत्त्वाचं आहे. अतिशय भाग्यवान असतात ती माणसं, ज्यांना चांगले गुरू लाभतात. ज्यांना गुरू नसतात, त्यांना आई-वडील असले तरीदेखील पोरकं म्हटलं जातं. त्यामुळे गुरू असणं ही खरोखरच अतिशय भाग्याची गोष्ट असते, असं मला वाटतं.
गुरू या शब्दाचा अर्थ ‘गु’ म्हणजे अज्ञान आणि ‘रू’ म्हणजे जो ते काढून टाकतो. जो तुमच्या आयुष्यातून अंधःकार किंवा अज्ञान दूर करतो तो गुरू. मी बरीच वर्षं नृत्य क्षेत्रात आहे. भरतनाट्यम् नृत्य परंपरेमध्ये नृत्य ‘शिक्षक’ अशी संकल्पनाच नसते. तिथे पिढ्यान्पिढ्या चालत आलेली गुरुपरंपराच असते. माझ्या पहिल्या गुरू होत्या स्वातीताई दातार. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामधले परिमल फडके हेसुद्धा मला गुरू म्हणून लाभले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून विशारद होईपर्यंतचं सगळं शिक्षण मी स्वातीताईंकडे घेतलं. नृत्यामधलं पुढचं, बीए, एमएपर्यंतचं शिक्षण मी परिमल सरांकडे घेतलं.