Sarod ghar gwalher
Esakal
भूषण तळवलकर
काही दालने फिरून, ख्यातकीर्त वादकांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेली अशी अनेक वाद्ये पाहून आपण बंगश घराण्यातील वादकांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मानचिन्हे ठेवलेल्या काही दालनांमध्ये फिरतो. खचाखच भरलेल्या कपाटांमध्ये संपूर्ण जगभरातून मिळालेले शेकडो पुरस्कार, पारितोषिके पाहताना आपण नतमस्तक होतो.
भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेत ग्वाल्हेर घराणे सर्वात प्राचीन घराण्यांपैकी एक मानले जाते. उत्तर भारतातील मुघल साम्राज्यकाळात या घराण्याचा उदय झाला. ग्वाल्हेरला जन्मलेल्या, तिथल्या तोमर राजाच्या दरबारात अनेक वर्षे सेवा दिलेल्या आणि आपल्या प्रौढवयात बादशहा अकबराच्या दरबारातील नवरत्नांमध्ये स्थान मिळवलेल्या संगीतसम्राट तानसेनने या घराण्याला सोळाव्या शतकात मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळेच आज ग्वाल्हेरला तानसेनचे एक संगीतगुरू असलेल्या महंमद गौस यांच्या हाजिरा भागातील भव्य मकबऱ्याशेजारी तानसेनची समाधीही आहे. नथ्थन पीरबक्ष, हद्दूखाँ, हस्सूखाँ, पं. पलूसकर, पं. इचलकरंजीकरबुवा, पं. ओंकारनाथ ठाकूर यांनी जशी ग्वाल्हेर घराण्याची ख्याल गायकी समृद्ध केली, तशीच उस्ताद हाफिज अली खाँ यांनी सरोद वाद्यामधून वादनशैली विकसित केली.
इंग्रजपूर्व काळातील अफगाणिस्तान आणि भारताच्या सीमाप्रांतातील बंगश परिवारातून मुख्य भारतभूमीत आलेल्या महंमद हाश्मी खान बंगश यांनी रबाब हे वाद्य भारतात आणले. अफगाण-पश्तून प्रांतात वाजवल्या जाणाऱ्या रबाब या तंतुवाद्यात आणि सरोदमध्ये साधर्म्य आढळते ते यामुळेच. पर्शियन भाषेत सरोद याचा अर्थ मंजूळ स्वर! महंमद हाश्मी खान बंगश यांचे पुत्र आणि पौत्र यांनी हे वाद्य अधिक विकसित करत भारतीय रागदारीच्या वादनासाठी अनुकूल केले. चौथ्या पिढीतील उस्ताद नन्हे खाँ यांनी ग्वाल्हेर दरबारातील राजवादक म्हणून काम करताना या वाद्याला आणखी राजमान्यता आणि लोकमान्यता मिळवून दिली. त्यांचे पुत्र, पाचव्या पिढीतील द्रष्टे कलाकार उस्ताद हाफिज अली खाँ यांनी सरोदवादनाला आध्यात्मिक पातळीवर नेले. १९६०मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, तेव्हा राष्ट्रपती