

Hair Fall Causes
esakal
स्वप्ना साने
स्वतःसाठी दिवसातली १५ मिनिटं राखीव ठेवावीत. अधूनमधून ब्यूटी थेरपिस्टकडे जाऊन छानसा हेअर कट करून यावा आणि हेअर केअर ट्रीटमेंटही विचारून घ्यावी. डाएटकडं लक्षं द्यावं. शरीरात कमतरता असलेल्या पोषणमूल्यांची माहिती करून घ्यावी आणि त्यानुसार आहारात, दिनचर्येत बदल करावा. न्यूट्रिशनल सप्लिमेंट्सची आवश्यकता असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानं त्याही सुरू कराव्यात.
सुंदर, दाट, सिल्की, काळेभोर, लांबसडक, हेल्दी केस... हे फक्त एखाद्या शाम्पूच्या जाहिरातीत मॉडेलचे बघायला मिळतात. क्वचितच एखाद्या युवतीचे केस खरोखरच तसे दिसतात. हल्ली अशा केसांची आपण फक्त कल्पनाच करू शकतो असं वाटतं. काही वर्षांपूर्वी बायकांना वयाच्या पस्तिशीत किंवा चाळिशीत केसगळतीची किंवा केस पांढरे होण्याची समस्या उद्भवायची. पूर्वी आपल्या आजीचे, पणजीचे केस तर सत्तरी-नव्वदी गाठूनसुद्धा बऱ्यापैकी लांब आणि जाडसर असायचे. पण हल्ली अगदी लहान वयापासूनच केसगळती, केस पांढरे होणं, विरळ होणं ह्या समस्या आढळून येतात. शिक्षण पूर्ण होईपर्यंत अनेक मुलांना समोरून टक्कल पडू लागलेलं असतं आणि मुलींचे जेमतेम खांद्यापर्यंतच्या लांबीचे केस उरलेले असतात.