

Happiness Happens Book Summary
esakal
वर्षा जोशी-आठवले
तुम्हीही आनंद शोधत असाल, तुमच्या जगण्याचं उद्दिष्ट शोधत असाल, आणि आयुष्य म्हणजे नेमकं काय? तुमच्या अस्तित्वामागचं नेमकं कारण काय? कशासाठी जगायचं आणि कसं जगायचं? या प्रश्नांची उत्तरं शोधत असाल, तर हॅपिनेस हॅपन्स हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं. कदाचित आपल्याला जे हवं ते यातून मिळेल.
रॉबिन सिंह यांचं हॅपिनेस हॅपन्स हे पुस्तक अलीकडेच वाचनात आलं. मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद. अत्यंत सोप्या भाषेत आणि ओघवत्या शैलीत हा अनुवाद उतरला असल्यामुळे वाचताना कुठंही अडथळा येत नाही. पुस्तकाचं वेगळेपण पहिल्या धड्यातच जाणवतं. नेहमीप्रमाणे प्रस्तावना, मनोगत असं सरधोपट न जाता ‘तुम्ही’ या प्रकरणानं पुस्तकाची सुरुवात होते. थोडं प्रस्तावनेच्या अंगानं जाणारं पण तरीही वाचकाच्या मनाचा ठाव घेणारं हे प्रकरण आहे. हे पुस्तक कधी वाचावं याबद्दल लेखक रॉबिन सिंह यात म्हणतो, ‘तुम्ही जर दुःखी असाल, विमनस्क असाल किंवा तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील, तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीनं करत असाल किंवा करू इच्छित असाल आणि त्यासाठी तुम्हाला अजून मार्गदर्शनाची गरज असेल आणि तिसरं म्हणजे तुम्ही हे पुस्तक न वाचता, सोशल मीडियावर येणाऱ्या न्यूज फीड पाहण्यातच वेळ घालवत असाल तर...’