

Mindfulness and happiness in daily routine
esakal
इरावती बारसोडे
निशांतला खरंतर असं एकटं कॉफी प्यायला, स्वतःसोबत वेळ घालवायला आवडायचं. पण हल्ली पाच मिनिटं जरी वेळ मिळाला की रील्स बघत बसायची सवय झाली होती. बाइक बंद पडल्याच्या निमित्तानं आणि मोबाईलची बॅटरी डेड झाली म्हणून, त्याला त्याचा ‘मी टाइम’ मिळाला होता.
दिवसभर सगळं बिनसूनही आता निशांत रिलॅक्स झाला होता, सुखी होता!
का काला येऊन दोन दिवस होऊन गेले होते, पण निशांत त्याला निवांत भेटलाच नव्हता. सकाळी घाईत निघायचा, त्यामुळे तेव्हा बोलायला वेळ मिळायचा नाही. आणि रात्री घरी पोहोचतोय तोपर्यंत काका जेवून झोपायच्या तयारीला लागलेला असायचा. तसा वेळेच्या बाबतीत काका पर्टिक्युलर होता. लवकर निजे नि लवकर उठे. काकालाही त्याची धावपळ दिसत होतीच. आज मात्र रविवार निशांतनं मोकळा ठेवला होता. कुठलाही प्लॅन ठरवला नव्हता त्यानं. आज तो कधी नव्हे ते रविवार असूनही लवकर उठला होता, कारण त्याला काकाला त्याच्या आवडत्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्टला न्यायचं होतं. दोघंच जाणार होते ते. निशांतला काकाशी, त्याच्या मित्राशी किती किती गप्पा मारायच्या होत्या. हा काका म्हणजे बाबांचा खूप जुना मित्र. कायम आनंदी, उत्साहानं सळसळणारा, खळाळून हसणारा काका निशांतला लहानपणापासून आवडायचा. काका म्हणजे काहीतरी वेगळंच रसायन आहे, असं त्याला नेहमी वाटायचं.
हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या डोशाची वाट पाहता पाहता काकानं विचारलं. ‘‘निश्या, सगळं ठीकठाक चाललंय ना तुझं? नीट जेवत, झोपत नाहीयस का?’’
‘‘झोपतो की काका. जेवतोसुद्धा व्यवस्थित. घरूनच डबा नेतो की.’’
‘‘मग?’’
‘‘काय मग?’’
‘‘मग असा का दिसतोयस उद्ध्वस्त झाल्यासारखा? डोळे बघ कसे ओढल्यासारखे दिसतायत? काही टेन्शन आहे का? कामात? घरात?’’