फूडपॉइंट| प्रिती सुगंधी
रसमलई चॉकलेट
साहित्य
दीडशे ग्रॅम व्हाइट चॉकलेट, १ टेबलस्पून कोको बटर, २ टेबलस्पून बारीक काप केलेले काजू, ३ टेबलस्पून बारीक काप केलेले पिस्ते, अर्धा टीस्पून रसमलई इसेन्स, पाव टीस्पून पिवळा फूड कलर.
कृती
सर्वप्रथम पिस्ता आणि काजूचे बारीक काप करून हलकेसे भाजून घ्यावेत. नंतर डबल बॉयलर पद्धतीने व्हाइट चॉकलेट आणि कोको बटर वितळवावे. चॉकलेट वितळत असताना सतत हलवत राहावे.
चॉकलेट नीट वितळल्यावर त्यात भाजलेले काजू-पिस्त्याचे काप घालावेत आणि सगळे मिश्रण एकजीव होईपर्यंत नीट मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यात रसमलई इसेन्स आणि थोडासा पिवळा फूड कलर घालावा व पुन्हा एकदा मिश्रण चांगले मिसळून घ्यावे.
हे मिश्रण हार्ट शेपच्या मोल्डमध्ये ओतून सेट होण्यासाठी १० ते १२ मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवावे. चॉकलेट मायक्रोवेव्हमध्ये वितळवायचे असल्यास चॉकलेट ३० सेकंद गरम करून हलवावे, पुन्हा ३० सेकंद गरम करून हलवावे. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने वितळवावे.