

Hoi An Lantern Festival Vietnam
esakal
मधुरा खिरे
होई आनमधून फिरताना प्रकर्षानं जाणवणारी आणि या शहराचं आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणता येईल अशी गोष्ट म्हणजे, इथल्या प्रत्येक घराबाहेर आणि दुकानाबाहेर टांगलेले कंदील! होई आनला जगभर ‘कंदिलांचं शहर’ म्हणून ओळखलं जातं. प्रत्येक महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी इथं लँटर्न फेस्टिव्हल साजरं केलं जातं.
आग्नेय आशियाच्या नकाशावर इंग्रजीतल्या ‘एस’ अक्षरासारखा आकार असलेला व्हिएतनाम समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि निसर्गसौंदर्यानं नटलेला देश आहे. पूर्वेला अथांग पसरलेला दक्षिण चीन समुद्र आणि पश्चिमेला घनदाट डोंगररांगांच्या कुशीत वसलेला हा देश एकेकाळी युद्धाच्या छायेत वावरत होता. आज मात्र या देशानं आपल्या आर्थिक प्रगतीनं जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. उत्तरेकडचं हानोई हे राजधानीचं शहर, तर दक्षिणेकडील हो-चि-मिन्ह हे व्हिएतनाममधलं सर्वात मोठं शहर आहे.
मी नुकताच व्हिएतनामचा दौरा करून आले, पण त्याबद्दल लिहायचं म्हटल्यावर सगळ्यात पहिलं स्थळ डोळ्यासमोर आलं, ते म्हणजे ‘होई आन’. तेच का? तर कदाचित मला वाटणाऱ्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या आकर्षणामुळे असेल किंवा ‘व्हिएतनाम आणि युद्ध’ या समीकरणाच्या पलीकडं व्हिएतनामी संस्कृतीचे अन्य पैलू समजून घेण्याच्या उत्सुकतेपोटी असेल! बॅक टू द फ्युचर या गाजलेल्या हॉलिवूड सिनेमातला नायक जसा टाइम मशिनमध्ये बसून थेट भूतकाळात प्रविष्ट होतो, तसाच काहीसा अनुभव होई आनमधल्या ‘ओल्ड टाऊन’मध्ये पाऊल टाकल्यावर येतो! जणू काळानं या शहरावर आपली जादूची कांडी फिरवली आहे आणि शतकांपूर्वीचं सौंदर्य आजही तिथं जिवंत ठेवलं आहे.
होई आन व्हिएतनामच्या किनारपट्टीवर वसलेलं, क्वांग नाम या प्रांतात असलेलं छोटंसं ऐतिहासिक शहर. होई आनला स्वतःचं विमानतळ किंवा रेल्वे स्टेशन नाही. त्यामुळे तिथं पोहोचण्यासाठी आधी दा नांग शहरात यावं लागतं. हानोई किंवा हो-चि-मिन्ह शहरातून दा नांगसाठी नियमित विमानं आहेत. दा नांगहून होई आनला टॅक्सी, बस किंवा रेल्वेनं पोहोचता येतं. होई आनला १९९९मध्ये युनेस्कोद्वारे जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे इथं फिरताना या जागेची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.