प्रसाद नामजोशी
तुम्हाला जर जेम्स बॉन्ड व्हायचं असेल तर तुम्ही कटिंग करायला कुठे जाता हे महत्त्वाचं आहे असं कुणी सांगितलं, तर त्यावर विश्वास बसणार नाही; पण १९६८ साली असं घडलं होतं! म्हणजे शॉन कॉनरीनं यू ओन्ली लिव्ह ट्वाइस हा पाचवा बॉन्डपट केल्यानंतर ‘आता मी जेम्स बॉन्ड करणार नाही’ असं सांगितलं आणि इयान फिल्म्सचा निर्माता अल्बर्ट ब्रोकोली नव्या बॉन्डच्या शोधाला लागला. या दरम्यान तो एका केशकर्तनालयात गेला होता.
तिथे त्याच्या शेजारी एकानं आपलं डोकं तिथल्या कारागिराच्या हवाली केलं होतं. त्याचं नाव होतं जॉर्ज लेझेनबी. त्याला बघून आपला जेम्स बॉन्डचा शोध संपला आहे, असं ब्रोकोलीला वाटलं. जॉर्ज मॉडेल होता आणि त्यालाही चित्रपट हवाच होता. दोघे एकत्र आले. जॉर्जनं ऑडिशन दिली, त्यात तो दिसायला तरी बॉन्ड वाटत होता.
एकदा आला आपल्या पट्ट्यात, की करेल अभिनय आपोआप असं निर्मात्याला वाटलं. आपल्याकडे जसं पाण्यात ढकललं की येईल पोहायला आपोपाप असं ठरवून पोरासोरांना दे-दणादण विहिरी-नद्यांमध्ये ढकलून दिलं जातं किंवा लग्नानंतर सगळं कळेल आपोआप असं गृहीत धरून हजारो लग्नं लावून दिली जातात त्यातलाच हा प्रकार.
तर असा एक बॉन्डपट झाला बुवा. त्याचं नाव होतं ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस आणि त्याची बॉन्ड गर्ल होती ट्रेसी डि व्हिसेंझो म्हणजे अभिनेत्री डायना रिग!