डॉ. माधव गाडगीळ
केशवसुत कोकणाच्या वर्णनात गातात:
जागोजागहि दाटल्या निबिड की त्या राहट्या रानटी ।
ते आईनहि, खैर, किंदळ तसे पाईरही वाढती।
वेली थोर इतस्ततः पसरुनी जातात गुंतून रे ।
चेष्टा त्यामधुनी यथेष्ट करिती नानापरी वानरे॥
लहानपणी मला कोडे असायचे की या राहट्या म्हणजे काय? मग वयाच्या नवव्या वर्षी मला ख्यातनाम सामाजशास्त्रज्ञ इरावती कर्व्यांबरोबर कर्नाटकातल्या वनाच्छादित कोडगु जिल्ह्यात जायला मिळाले आणि हे कोडे उलगडले. इथे सगळीकडे लोकांनी पावित्र्याच्या भावनेने राखलेल्या देवराया पसरल्या होत्या.
याच होत्या केशवसुतांच्या राहट्या. त्यातली सर्वात विस्तृत होती कावेरी नदीच्या उगमाजवळची तलकावेरीची देवराई. नक्कीच ही पाणलोट क्षेत्राच्या रक्षणाच्या हेतूने राखून ठेवली आहे. म्हणजेच एक प्रकारच्या परिसेवेसाठी जतन केली आहे.