मानसी सराफ जोशी
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगातील समस्यांना सामोरे जायला तंत्रज्ञानाचीच मदत घेतली, तर ते सोपेही जाते आणि प्रभावशालीही ठरते. याच विचारधारणेला धरून सायबर एक्स्पर्ट, पोलिस, सरकार मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमा राबवत आहे. त्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी साधन वापरत आहेत. सायबर गुन्ह्यांविषयीचा अवेअरनेस वाढवण्यातील सोशल मीडियाची भूमिका विस्तारून सांगणारा तज्ज्ञांशी साधलेला संवाद...
असंख्य लोकांचा सोशल मीडियाचा वापर हे काही नवे चित्र नाही. मात्र तंत्रज्ञान कसे वापरावे याबद्दल आजही पुरेसे ज्ञान नसल्यामुळे अनेकजण सायबर गुन्ह्यांना बळी पडत आहेत. आश्चर्याचा भाग म्हणजे यात माहिती तंत्रज्ञान अभियंत्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. एकट्या पुण्यात २०२४मध्ये एकूण १,५०४ सायबर गुन्ह्यांमध्ये ६ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कम गमवाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले होेते. ही गुन्ह्यांची संख्या मुंबई, नागपूर आणि ठाणे या तीनही शहरांपेक्षा जास्त आहे.