हजारो वर्ष लडाखची वंशावळ कशी बदलत गेली? त्यांच्या जनुकीय बदलांमागे नेमके कारण काय? जाणून घ्या

बारा हजार वर्षांपूर्वीच्या नवपाषाणयुगापासून ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या ब्राँझ युगापर्यंत लडाखमधून विविध मानवसमूहांचा प्रवास झाला..
ladakh people
ladakh people Esakal

बारा हजार वर्षांपूर्वीच्या नवपाषाणयुगापासून ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या ब्राँझ युगापर्यंत लडाखमधून विविध मानवसमूहांचा प्रवास झाला, त्यांचा एकमेकांशी संकर होत गेला आणि त्यातून जन्माला आलेल्या प्रजेचा पुढचा प्रसार झाला; याचंच प्रतिबिंब या जनुकीय वारशामध्ये दिसून येत आहे.

डॉ. बाळ फोंडके

लडाख हा कालपर्यंत जम्मू आणि काश्मीर राज्याचाच भाग होता. अलीकडेच झालेल्या काही प्रशासकीय बदलांपोटी त्याला उर्वरित जम्मू आणि काश्मीरपासून वेगळं केलं गेलं आहे. पण ही झाली एक प्रशासकीय सोय.

त्यापायी तिथल्या नागरिकांचं काय? तिथल्या नागरिकांच्या नातेसंबंधांचं काय? त्यांचे सगेसोयरे कोण आहेत? याचाच धांडोळा घेण्याचे प्रयत्न आता होत आहेत.

त्या नागरिकांचा जनुकीय वारसा काय सांगतो, याचा वेध घेण्याचे प्रयत्न हैदराबादच्या सीसीएमबी या संस्थेतील वैज्ञानिकांनी तसंच स्पेनमधील वैज्ञानिकांच्या एका गटानं केले आहेत.

भौगोलिकदृष्ट्याही लडाखचं स्थान आगळंवेगळं आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या प्रदेशात उंचावरच्या अनेक खिंडी आहेत.

त्यातून प्राचीन काळात मानवांचा प्रवास आणि स्थलांतर झालेलं आहे. आज जरी तो दुर्गम असला, तरी एकेकाळी व्यापारी मार्गाचा, खास करून ज्याला सिल्क रुट म्हणून ओळखलं जातं, त्या आशिया ते युरोप या प्रवासाचा तो महत्त्वाचा भाग होता.

त्याचाच वापर करत उत्तर ध्रुवाजवळच्या आधुनिक मानवानं आशिया, युरोप एवढंच काय पण आफ्रिका खंडांमध्येही हातपाय पसरले होते. पंजाबातील अमृतसर ते नैऋत्य चीनमधील यारकंड हा साठ दिवसांचा प्रवास याच मार्गावरून एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत होत होता.

त्याच्या साथीनंच या मार्गाचा एक भाग कॅलिम्पाँग या बंगालमधील शहराची नाळ, तिबेटची राजधानी ल्हासाला जोडत होता.

हा झाला व्यापार-उद्योगापायी होणारा दूरदूरवरचा प्रवास. त्या काळातील वाहतुकीच्या साधनांचा विचार करता, या मध्यवर्ती प्रदेशात काही काळासाठी का होईना, पण मुक्काम करावा लागत असणार. त्या व्यतिरिक्त अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात नवनव्या प्रदेशांचा वेध घेत झालेल्या मानवी स्थलांतरासाठीही याच प्रदेशातून वाटचाल होत होती.

त्यात भर पडली ती चौदाव्या ते सोळाव्या शतकांमधील मध्य आशियातील इस्लामी राजवटींनी केलेल्या आक्रमणाची. यापायी आधुनिक मानवाच्या अनेक वांशिक गटांचा एकमेकांशी संपर्क येत होता. त्यांची सरमिसळही होत असावी, असा अंदाज करणं स्वाभाविक आहे. त्याचं प्रतिबिंब सध्याच्या लडाखी नागरिकांच्या जनुकीय वारशात पडलेलं आहे की काय, याचा मागोवा वैज्ञानिकांना खुणावत होता.

या दोन गटांचं अंतिम उद्दिष्ट जरी एकच असलं, तरी ते गाठण्यासाठी त्यांनी निवडलेले मार्ग वेगवेगळे आहेत. स्पॅनिश वैज्ञानिकांनी मानवी शरीरातील ‘वाय’ गुणसूत्राचा मागोवा घेतला आहे. हे गुणसूत्र फक्त पुरुष संततीतच आढळतं, किंबहुना कोणत्याही व्यक्तीचं पुरुषत्व ते निर्धारित करतं.

त्याच्या पेशींमध्ये एक गुणसूत्र ‘एक्स’, तर दुसरं ‘वाय’ असतं. त्यातील ‘वाय’ हे त्याला पित्याकडून मिळालेलं असतं. त्यापायी मग कोणत्याही व्यक्तीचे वडील, आजोबा, पणजोबा यांची ओळख पटवता येते. पैतृक वंशावळ सिद्ध करता येते. हैदराबादमधील वैज्ञानिकांच्या एका गटानंही याच ‘वाय’ गुणसूत्रावर आपलं संशोधन आधारलेलं आहे.

पण लडाखमधून झालेली स्थलांतरं केवळ पुरुषांचीच नव्हती. व्यापारउदीमासाठी बहुतांश पुरुषमंडळीच जरी बाहेर पडली असली, तरी स्त्रिया अजिबातच नव्हत्या असं नाही. शिवाय जी स्थलांतरं अन्नपाण्यासाठी नवनव्या प्रदेशांकडे आकर्षित झाली होती, त्यात तर सर्वच कुटुंबकबिल्याचा समावेश होता.

तेव्हा फक्त पैतृक वंशवेलीचा विचार अपूर्ण ठरण्याची शक्यता धरून मातृक वंशावळीचा मागोवा घेणंही अगत्याचं असल्याचं हैदराबाद येथील वैज्ञानिकांनी ठरवलं.

‘वाय’ गुणसूत्र हा जसा केवळ पित्यानं बहाल केलेला वारसा असतो, तसाच मायटोकाँड्रिया या उपांगातील डीएनए हा केवळ मातेनं प्रदान केलेला वारसा असतो. त्या डीएनएचा वेध प्रत्येक मुलाची, पुरुष संतती तसंच स्त्री संतती, दोघांचीही आई, आजी, पणजी यांच्या जनुकीय नकाशापर्यंत पोहोचवतो.

‘वाय’ गुणसूत्र आणि मायटोकाँड्रिया या दोन्हींचा वेध घेतल्यास या नागरिकांच्या संपूर्ण जनुकीय वारशाच्या उगमापर्यंत पोहोचणं शक्य होतं. तेच हैदराबादमधील वैज्ञानिकांनी केलं आहे. या गटांचे मार्ग जरी वेगवेगळे असले, तरी त्यातून निघालेला एक निष्कर्ष समान आहे. लडाखी नागरिकांच्या जनुकीय वारशात मोठ्या प्रमाणात विविधता आहे.

याचाच अर्थ असा, की गेल्या काही शतकांमध्ये त्या प्रदेशात जो निरनिराळ्या वांशिक गटांचा निकटचा संबंध आला, जी जवळीक निर्माण झाली, त्यातून एक वांशिक गोधडीच तयार झाली आहे. त्या नागरिकांचं जवळचं नातं भारतातील तसंच नजीकच्या इतर राष्ट्रांच्या सध्याच्या नागरिकांशी जुळलेलं आहे.

स्पेनच्या वैज्ञानिकांनी अडीचशे लडाखी पुरुषांच्या गालांच्या आतल्या बाजूतील त्वचेचे नमुने मिळवले. त्यांच्या जनुकीय नकाशांची तुलना त्यांनी निरनिराळ्या एक्केचाळीस आशियाई नागरिकांच्या जनुकीय नकाशाशी केली.

त्यांच्यामधील समान धाग्यांचा वेध घेतला. उत्तर तसंच दक्षिण आशियातील सध्याच्या विविध नागरिकांशी लडाखी नागरिकांचं जवळचं नातं असल्याचं त्यातून प्रस्थापित झालं आहे.

याचाच अर्थ पाषाण युगात हिमालयाच्या उत्तरेकडून आलेल्या मानवसमूहाचा लडाखमधील विविध वांशिक समूहांशी संकर होऊन त्यांची प्रजावळ आशिया खंडाच्या सर्वदूर भागात पसरली, हे या वैज्ञानिकांनी अधोरेखित केलं आहे.

ladakh people
Sleep Stages : झोपेत तुमचे शरीर, मेंदू आणि मन कोणत्या अवस्थेतून जाते?

याच ‘वाय’ गुणसूत्राचं अध्ययन करणाऱ्या हैदराबादमधील वैज्ञानिकांनीही त्याला दुजोरा दिला आहे. पण त्यांनी त्याही पुढची पायरी गाठत लडाखी नागरिकांच्या नजीकच्या जम्मू प्रदेशातील गुज्जर नागरिकांशी असलेल्या नात्याचा वेध घेतला आहे.

वास्तविक हे दोन समाज आज भौगोलिकदृष्ट्या जवळजवळ वसलेले आहेत. तेव्हा ते मूळच्या एकाच वंशाच्या दोन शाखा असाव्यात असं अनुमान काढणं शक्य होतं.

पण ‘वाय’ गुणसूत्राच्या माध्यमातून केलेल्या त्यांच्या तौलनिक अभ्यासातून गुज्जरांचं नातं लडाखी नागरिकांशी नसून उलट ते अफगाणिस्तानातील पश्तुनांशी, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील पश्तुनांशी, तसंच सिंधी जमातीशी असल्याचं दिसून आलं आहे.

लडाखपेक्षा अधिक दूर असलेल्या या प्रदेशातील नागरिकांशी गुज्जरांचं निकटचं नातं असणं पाषाणयुगातील मानवाचं स्थलांतर आणि वंशविस्तार कसा झाला असावा, याचं निदर्शक आहे.

मातृकुलाचा मागोवा घेणाऱ्या हैदराबादमधील वैज्ञानिकांनी लडाखमधील ब्रोकपा, चांगपा आणि मोनपा या तीन जमातीतील १०८ व्यक्तींच्या जनुकीय नकाशाची तुलना दक्षिण, आग्नेय आशिया, तिबेट आणि पश्चिम युरेशियामधील नागरिकांच्या जनुकीय वारशाशी केली. त्यालाच पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी मिळवलेल्या माहितीची जोड दिली.

काही ऐतिहासिक दस्तावेजांचीही पाहणी केली. या एकात्मिक संशोधनातून चांगपा आणि ब्रोकपा यांचं मातृकुल एकच असल्याचं स्पष्ट झालं. मात्र मोनपा समाज त्यांच्यापासून वेगळा असल्याचंही दिसून आलं.

बारा हजार वर्षांपूर्वीच्या नवपाषाणयुगापासून ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या ब्राँझ युगापर्यंत लडाखमधून विविध मानवसमूहांचा प्रवास झाला, त्यांचा एकमेकांशी संकर होत गेला आणि त्यातून जन्माला आलेल्या प्रजेचा पुढचा प्रसार झाला; याचंच प्रतिबिंब या जनुकीय वारशामध्ये दिसून येत आहे. मानवजातीच्या इतिहासाला अधिक नेटकेपण देण्याचं काम जनुकीय वारशाच्या अध्ययनातून होऊ शकतं, हेच या संशोधनानं निःसंदिग्धपणे दाखवून दिलं आहे.

----------------

ladakh people
DNA मधील बिघाड सुधारता येणार! अमेरिकेत नवीन तंत्रज्ञानाला मान्यता (CRISPR Genes Editing)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com