योगमार्गावर चालताना मी कोण आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे आणि तो उद्देश कसा प्राप्त करावा या मानवी जीवनातील मूलभूत प्रश्नांची उत्तरे मिळतात. द्वैतविरहित स्थिती चांगले आरोग्य, मानसिक शांती हे सुख प्रदान करतेच. योगसाधना करणारी व्यक्ती केवळ शाश्वत आनंद आणि शांती प्राप्त करत नाही, तर आपल्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेते आणि अस्तित्वाचा उद्देश साध्य करते.
योग हे अत्यंत पुरातन शास्त्र आहे. संत साहित्यात आणि परंपरागत योग ग्रंथांत अनेक योगविषयक उल्लेख आढळतात. परंपरेमुळे योगविषयक ज्ञान आपल्यापर्यंत, म्हणजेच आधुनिक काळापर्यंत पोहोचू शकले आहे. या काळात अशा ज्ञानाचे संवर्धन आणि जतन करणे महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान फक्त जतन करून भागणार नाही, तर समाजाच्या भल्यासाठी प्रचारित आणि प्रसारित करणेही तेवढेच आवश्यक आहे.