योगाचार्य डॉ. आनंद बालयोगी भवानी
श्वास ही केवळ जिवंत राहण्याची प्रक्रिया नाही. ती शरीर, मन आणि आत्म्याला एकसंध बांधणारा सेतू आहे. प्राणायामाच्या नियोजनबद्ध सरावातून केवळ शारीरिक विकारच नव्हे, तर मानसिक, स्नायूंचे, मेंदूचे आणि मज्जासंस्थेचे संतुलनही शक्य होते. दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, नैराश्य, तणाव यांसारख्या अनेक आजारांवर प्रभावी उपाय म्हणून प्राणायाम उपयोगी ठरतो आहे.
प्राणायामामध्ये मानसिक आणि शारीरिक विकारांवर उपचार करण्याची अपार क्षमता आहे. स्वतंत्रपणे किंवा आसने आणि योगाच्या इतर पैलूंसोबत प्राणायाम प्रभावीपणे वापरला जाऊ शकतो. प्राणायामाचा अभ्यास करताना योग्य आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन याला विशेष महत्त्व आहे. कारण शरीराला व्याधीमुक्त होण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि पाणी यांसारख्या मूलभूत घटकांची गरज असते.
हठयोगप्रदीपिकेनुसार प्राणायामामुळे नाड्या शुद्ध होतात, शरीर लवचिक आणि तेजस्वी होते, पचनशक्ती वाढते, आंतरिक नाद ऐकू येतात आणि उत्कृष्ट आरोग्य मिळते.