

Urban Terrace Gardening Guide
esakal
डॉ. तृप्ती करेकट्टी/डॉ. दिलीप माळी
गेल्या काही लेखांमधून आपण कुंडी कोणती निवडावी, माती आणि मातीऐवजी वापरण्यासाठीचे पर्यायी मिश्रण, मातीची पोषणद्रव्ये वाढण्यासाठी घरगुती कंपोस्ट या गोष्टी पहिल्या. आता प्रश्न येतो तो कुंडी किंवा ग्रो बॅग भरायची कशी? हा प्रश्न तुम्हाला कदाचित गमतीशीर वाटेल. त्यात विचारण्यासारखे काय आहे? कुंडीत माती तर भरायची आहे. पण, कुंडीत माती वगैरे ‘पॉटिंग मिश्रण’ भरायची विशिष्ट पद्धत असते आणि ती जमली, तर पुढील अनेक अडचणी आणि कष्ट कमी होतात. कुंडीमध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी, नाहीतर मुळे कुजतात. त्यासाठी जसे हलके, भुसभुशीत, पाण्याचा योग्य निचरा होणारे माती-मिश्रण गरजेचे आहे, तसेच ते मिश्रण कुंडीमध्ये योग्यरितीने भरणे गरजेचे आहे.
झाडाच्या गरजेनुसार एकदा कंटेनर निवडला, की या कंटेनरमधून पाणी निचरा होण्याची सोय आहे ना याची प्रथम खात्री करून घेणे अतिशय गरजेचे आहे. कुंडीला तळाशी आवश्यक तेवढी छिद्रे हवीत. ग्रो बॅगमधून पाणी बाहेर झिरपून जायला हवे. माती भरताना चुकते काय, तर काही दिवसांनी पाण्याबरोबर माती वाहून जाताना माती अडकून हळूहळू ही छिद्रे बंद होतात. मग पाणी साठायला लागते आणि झाडाचे आरोग्य खराब होते. झाड सुकू लागते. आपल्याला वाटते पाणी कमी पडते आहे आणि आपण आणखी पाणी घालतो. त्यामुळे माती भरताना घ्यायची काळजी खरेतर या छिद्रांची आहे. हे जमले तर झाडाचे आरोग्य चांगले राहते आणि बागकाम सोपे होते, आनंददायी होते.