आजच्या अल्फा जनरेशनचं बालपण वेगळंच आहे. ते एका अर्थी अद्भुत आहे. आईच्या बोटाआधी ह्या पिढीच्या हातात स्मार्टफोन येतो, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती वाटू नये, असे हे दिवस. झोपी जाण्यापूर्वी आजीच्या गोष्टी ऐकण्याऐवजी ही पिढी यूट्यूबवर कार्टून शोधते, मोठ्यांच्या मदतीशिवाय! (अनेकदा या मोठ्यांनीही त्या लहानांइतक्या सफाईने मोबाईलवर काही शोधता येत नाही, हा भाग अलाहिदा!) ही तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या परिवर्तनाची फक्त नांदी आहे, कारण २०१०नंतरची ही अल्फा जनरेशन बाळं थेट ५-जीच्या वेगवान, डिजिटल, कनेक्टेड विश्वात जन्मली आहेत. इथून पुढे त्यांचं शिक्षण, करिअर, जीवनशैली या सगळ्यावर अद्ययावत तंत्रज्ञानाचा अमिट प्रभाव राहणार आहे.