विलायती वाचताना: डॉ. आशुतोष जावडेकर
अनेकदा समीक्षक किंवा चांगले वाचक बेस्टसेलर नाव ऐकल्यावर नाक मुरडतात. परंतु साहित्याची विभागणी इतकी ढोबळ नसते. अनेकदा अभिजात कलाकृतीमध्ये पॉप्युलर घटक असतात. आणि एखादी बेस्टसेलर अभिजात साहित्याच्या सगळ्या शक्यतांसह उभी असते! तो लेखक नंतर पुढे जाऊन वेगळं अभिजात असं लिहितो.
इंग्रजी पुस्तके वाचायला सुरुवात करूया म्हणून जेव्हा एखादा नवा वाचक (खऱ्या किंवा ऑनलाइन) दुकानात जातो, तेव्हा त्याला पहिल्यांदा समोर दिसतात ती बेस्टसेलर पुस्तकं. ‘बेस्टसेलर’ हा शब्दच इतका बोलका आहे, की मग वेगळं काही सांगायची गरज उरत नाही. तडाखेबंद पुस्तकविक्रीच्या कहाण्या सांगणाऱ्या बेस्टसेलरचा कप्पा ओलांडला, की मग ‘क्लासिक्स’ हा विभाग लागतो!
दुकानाच्या या दालनात रेंगाळणारी माणसं अनेकदा आपल्या तोऱ्यात असतात. आणि बेस्टसेलर विकत घेणाऱ्या गिऱ्हाइकांकडे दर्याद्र कटाक्ष टाकतात! चांगले वाचक मात्र दोन्ही कप्प्यांवर लक्ष ठेवून असतात. कारण त्यांना माहीत असतं, की आधी बेस्टसेलर असलेली कादंबरी काळाच्या ओघात क्लासिकचा अभिजात दर्जा मिळवेल.