

Hrishikesh Mukherjee Films
esakal
सुलभा तेरणीकर
सिनेसंस्कृतीनं भारतीय जनमानसात चांगलंच मूळ धरलं, तरी कधीतरी त्याचा थांग लागत नाही. बायकोचा भाऊ, जावई माझा भला, सूनबाई, वरदक्षिणा असे चित्रपट येऊ लागतात आणि मराठी चित्रपटाचा चेहरा एकदम कौटुंबिक होऊन जातो. हिंदीत नॉटीबॉय, मॅडम झोरो, मायाजाल असे चित्रपट दिसतात तेव्हा अभिरुचीबाबत प्रश्न उठतो. पण भारतीय सिनेमात काहीही घडतं. साहिब बीबी और गुलामसारखा सिनेमा येतो आणि आपल्या संस्कृतीची मुळं हलतात... सिनेमाची कहाणी रंगतदार होते... आपल्या जीवनासारखी...!
सिनेमाच्या कथेत बरीच वळणं येतात. यशापयशाचा लपंडाव सुरूच असतो. बिमल रॉय स्कूलच्या हृषिकेश मुखर्जींनी अनाडीमध्ये लोकप्रियतेची नस चांगलीच पकडली होती. पण १९६२चा आशिक मात्र चालला नाही. हृषिकेश मुखर्जी आणि राज कपूर यांचं घट्ट मैत्र. राज कपूर त्यांना प्रेमाचं ‘बाबूमोशाय’ म्हणायचे. पण आशिकमध्ये हृषीदा, राज कपूर असूनही भट्टी जमली नाही. शंकर-जयकिशनची सुंदर गाणी असूनही यशाचा सूर लागला नाही. नायिका पद्मिनीच्या नृत्यांची रेलचेल असूनही आशिक चालला नाही. सिनेपत्रकार, लेखक, राज कपूरचे मित्र बनी रुबेन यांनी सिनेमानिर्मितीत हात मात्र पोळून घेतले... ‘तुम जो हमारे मीत न होते, गीत ये मेरे गीत न होते...’ असं शैलेन्द्र लिहून गेले खरं, पण अपयश हे अपयशच असतं हेच सिद्ध झालं. पण याच वर्षी आलेला असली नकली मात्र छान चालला. निर्माते एल. बी. लछमन - दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी आणि संगीतकार शंकर-जयकिशन ही अनाडीची टीम आणि सिनेमाचं नाव ‘अ’च्या बाराखडीतलं. यात नायक मात्र होते देव आनंद आणि नायिका साधना! श्रीमंत नायक आणि गरीब नायिका... आणि गरिबी-श्रीमंतीच्या दरीवर मात करणारं सदाबहार प्रेम! कथा साधीच होती, पण हृषिकेशन मुखर्जी वास्तव आणि लोकप्रिय फॉर्म्युला याची अचूक सांगड घालत होते. शिक्षिका होऊन घर चालवणारी युवती म्हणून साधना या चित्रपटात ‘साधना कट’मध्ये दिसत नाही. गजरा माळलेला केसांचा छान अंबाडा आणि अशा रूपातली साधना लताच्या स्वरातलं ‘तेरा मेरा प्यार अमर...’ गाताना दिसते. या काळात लता-रफीच्या रॉयल्टी वादातून सुटलेलं सिनेसंगीत संगीतप्रेमींना अवचित मिळालं. गरीब वस्तीत जाऊन राहणारा श्रीमंत नायक, तिथल्या माणसांशी जुळलेलं नातं अशा कथा आवडणारा एक प्रेक्षकवर्ग तयार झाला खरा.