Premium|Human Nature Relationship : निसर्गाशी नातं; संशोधक, आदिवासी आणि शहरी माणसाच्या तीन वाटा, एकच गाभा

Two Ways of Understanding Nature : निसर्गाकडे पाहण्याची आधुनिक आणि पारंपरिक दृष्टी वेगळी असली, तरी जंगलाशी जगण्याचे नाते दोन्हींत समान आहे. अनुभवातून मिळालेले स्थानिक ज्ञान निसर्ग समजून घेण्यासाठी तितकेच महत्त्वाचे ठरते.
Human Nature Relationship

Human Nature Relationship

esakal

Updated on

डॉ. मंदार दातार

एकेकाळी प्रत्येक समाजाची निसर्गाशी संवाद साधण्याची एक भाषा होती. पण गेल्या काही शतकांत, विशेषत: औद्योगिक क्रांतीनंतर निसर्गाकडे हळूहळू स्रोत म्हणून पाहिले जाऊ लागले आणि हे नाते मागे पडत गेले. निसर्ग एक प्रकारचा व्यवहार झाला. आपल्याला प्रासाद मिळाले, कानन मात्र हरवत गेले. पण आजही शहरी माणसामध्ये असलेली निसर्गाची ओढ हे त्याच गमावलेल्या नात्याचे प्रतिबिंब आहे.

तीस वर्षांपूर्वी मी पीएच.डी. करण्यासाठी गोव्यातील मोलेम राष्ट्रीय उद्यानामधील वनस्पतींचा अभ्यास करत होतो. तिथल्या वनविभागातील कर्मचारी माझी अगदी लहान मुलासारखीच काळजी घेत. जंगलात जाताना कोणीतरी माझ्या सोबतीला असेल, याची खात्री करत. जंगलात फिरताना माझ्यासोबत बरेचदा कृष्णा असायचा. आधी अभयारण्यातच असलेल्या, पण नंतर बाहेर विस्थापित झालेल्या नांद्रन नावाच्या गावाचा हा मुलगा. कृष्णा थोडा खोडकर व संशयी स्वभावाचा होता. त्याला फिरताना कंटाळा आला आणि मी लवकर निघावे असे वाटले, की तो मला प्राण्यांची भीती दाखवायचा. मात्र जंगलात मला एकट्याला सोडून तो कधीही निघून गेला नाही.

बरेचदा त्या जंगलात आम्ही दोघे एकत्र चालत असू, पण आम्हा दोघांनाही जंगल वेगळे दिसत असे. मी हर्बेरियमच्या संग्रहासाठी झाड व फुले असलेल्या फांद्या शोधत असे. माझी नजर कुठल्या वनस्पतीला फुले आली आहेत, कुठे एखाद्या वनस्पतीची नवीन प्रजाती दिसत आहे, यावर असायची. कृष्णाची नजर मात्र वेगळ्याच गोष्टींवर असायची. जमिनीवर प्राण्यांच्या पायांचे ताजे ठसे, संभाव्य धोके, वाटेत मिळणाऱ्या रानभाज्या, खाण्यायोग्य रानफळे याकडे त्याचे लक्ष असे. माझ्यासाठी वनस्पती संग्राह्य नमुना असायच्या, तर कृष्णासाठी त्या जगण्याचे साधन होत्या. एकेदिवशी जंगलातून परत येताना धो धो पाऊस कोसळत होता. त्यामुळे आम्ही एका फणसाच्या झाडाखाली आडोशाला उभे राहिलो. तिथे माझ्या मनात एक प्रश्‍न निर्माण झाला, आमच्या दोघांपैकी कुणाचे जंगलप्रेम श्रेष्ठ आणि कुणाचे दुय्यम? माझे शास्त्रीय ज्ञान जास्त मोलाचे की कृष्णाचे जगण्यातून आलेले ज्ञान मोलाचे? अर्थात आम्ही दोघेही हे ‘ज्ञानग्रहण’ जगण्यासाठीच करत होतो; फक्त फरक एवढाच, की त्याचे ज्ञानग्रहण प्रत्यक्ष होते आणि माझे अप्रत्यक्ष.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com