रिपोर्ताज । संजय करकरे
चंद्रपूर जिल्ह्यात तीव्र होणाऱ्या मानव-वाघ संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅमेरे, रिअल टाइम मॉनिटरिंग याबरोबरच तेथील नागरिकांचे वनांवरील अवलंबन कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाघांची वाढती संख्या आणि मर्यादित अधिवासाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सहअस्तित्व साधण्याच्या प्रयत्नांची उकल करणारा रिपोर्ताज...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मानव-वाघ संघर्ष टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. बफर क्षेत्रातील १२ संवेदनशील गावांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) आधारित ७२ कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
या कॅमेऱ्यांत वाघ, बिबट्या किंवा अस्वल अशा वन्यप्राण्यांचे फोटो टिपले जाताच त्याची माहिती प्रत्यक्ष ठिकाणाहून वन विभागातील मोजक्या अधिकाऱ्यांना व शीघ्र कृती दलाच्या (पीआरटी) सदस्यांना त्वरित मोबाईलवर मिळते. याशिवाय सिम कार्डयुक्त कॅमेरा ट्रॅप्सचाही परिणामकारक वापर केला जात आहे. यामधून वाघांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या हालचाली समजून घेणे आणि त्याआधारे गावकऱ्यांना वेळीच सावध करणे शक्य झाले आहे.
या तंत्रज्ञानामुळे संघर्षाच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. सध्या हे ‘रिअल टाइम मॉनिटरिंग’ तंत्रज्ञान इतर प्रादेशिक वन विभागांतही अमलात आणले जात आहे. चंद्रपूरमध्ये ५ जून रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या अत्याधुनिक वन नियंत्रण कक्षाद्वारे वन गुन्हे, मानव-वन्यजीव संघर्ष, वनवणवा यांसारख्या घटनांवर तातडीने लक्ष ठेवण्याची सुविधा निर्माण झाली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने जंगलातील सुरक्षा आणि संवर्धन अधिक सुदृढ होत आहे.