सुनिता टिल्लू
जोगळेकरांच्या विडंबन कवितांमुळे हास्याचे फवारे किंवा हास्याचा कल्लोळ उठणार नाही कदाचित, पण वाचकांच्या ओठांच्या कोपऱ्यात एक प्रसन्न हसू उमटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा ‘बेहद्द नाममात्र’ घोडा चौखूर उधळणारा नाही, तर हास्याच्या हलक्या टापा टाकत वाचकांच्या मनात शिरणारा आहे.
विडंबन म्हणजे कवीला किंवा लेखकाला एखाद्या घटनेमध्ये, परिस्थितीमध्ये किंवा व्यक्तीच्या वृत्ती-प्रवृत्तीमधून जाणवलेल्या विसंगतीचे व्यंगात्म अंगाने, पण गमतीशीरपणे घडवलेले दर्शन. कवी व लेखक हेमंत गोविंद जोगळेकर यांच्या माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा अशा शीर्षकाच्या विडंबन कवितासंग्रहात जोगळेकरांनी वाङ्मयीन विडंबने केली आहेत. त्यांच्या ‘अंतःप्रेरणेवर चाल करून’ आलेल्या कवींच्या ४१ कवितांनी त्यांना विडंबनासाठी उद्युक्त केले आहे.