Krishna River
Esakal
श्रीकांत इंगळहळीकर
मी कृष्णा, सह्याद्रीच्या शिखरावर जन्मून सागराच्या दिशेनं वाहते, माझ्या काठांवर निसर्ग आणि मानवाची कहाणी फुलते. पण मानवी हस्तक्षेप, धरणं आणि प्रदूषणामुळे माझा प्रवाह अडला. निसर्ग आणि जीवसृष्टीच्या संतुलनावर संकट आलं. माझ्या प्रवासाची ही संघर्षमय आणि सांस्कृतिक कथा...
मस्कार, मी कृष्णा...
गोदावरी, कावेरी आणि मी दक्षिण भारतातल्या मुख्य नद्या आहोत. जीवसृष्टीचा उगम नदीपासूनच झाला आहे. नदीकाठी वनस्पती, पक्षी, प्राणी आणि इतर सजीव यांची विविधता फुलविण्याची जबाबदारी ब्रह्मदेवाने आम्हावर सोपवली होती. प्रगल्भ बुद्धिमत्तेचा माणूस हव्यासामागे लागल्यावर मात्र आमचा निर्मितीतला आनंद संपला आहे. जीवनदायिनी आई या नदीशी असलेल्या नात्याचा आता माणसांना विसर पडला आहे, या दुःखापोटी मी हे आत्मकथन करते आहे. माझ्या लेकरांबरोबर माझी तुटलेली नाळ पुन्हा जोडली जावी हे माझं स्वप्न आहे.
माझी जीवनगाथा अब्जावधी वर्षांची आहे. तेव्हा पृथ्वीवर महासागरांचं राज्य होतं. सूर्याच्या प्रखरतेमुळे सागरावर तयार झालेले ढग हिमालयाच्या शिखरांवर बर्फ जमवू लागले. तो बर्फ उन्हात वितळून बर्फाच्या गोमुखातून गंगेचा उगम झाला. गंगा स्वर्गातून भगवान शंकराच्या जटांमध्ये कशी अवतरली ती कथाही तुम्ही ऐकली असेल. माझा जन्म मात्र सह्याद्रीच्या शिखरावरचा. पूर्वेकडच्या महासागरातून आलेल्या मेघपर्वतांनी सह्याद्रीच्या शिखरावर वर्षाव केलेल्या पावसातून मी जन्मले.
माझी जन्मकथा अशीही सांगतात - सह्याद्री पर्वताच्या शिखरावर महाबल राक्षस होता. त्याचा वध करून शिवानं त्या जागी महालिंग निर्माण केलं आणि ती जागा क्षेत्र महाबळेश्वर अशी प्रसिद्ध झाली. याच क्षेत्रात नंतर ब्रह्मदेवानं सगळे ऋषी आणि देव जमवून एक महायज्ञ योजला. यज्ञातल्या दीक्षेच्या मुहूर्ताला ब्रह्मदेवाची ज्येष्ठ भार्या सावित्री उपस्थित राहिली नाही. त्यामुळे देवांनी कनिष्ठ पत्नी गायत्री हिला दीक्षेसाठी पाचारण केलं. हे कळल्यावर क्रोधित होऊन सावित्रीनं सगळ्या देवांना, ऋषींना शाप दिला, की सगळ्यांना जडत्व प्राप्त होईल. जडत्व आलेल्या देवतांनी सावित्रीकडे क्षमायाचना केली, तेव्हा सावित्रीनं जडऐवजी जल असा उःशाप दिला. विष्णूनंही क्रोधित होऊन सावित्रीला तोच शाप दिला. सगळ्या देवाचं रूप झरे, तलाव आणि कुंड अशा जलसंचयात बदललं. पाच मुख्य देवांचं रूप नद्यांमध्ये बदललं. ब्रह्मदेवाच्या भार्या सावित्री आणि गायत्री या नद्या होऊन पश्चिमेकडे प्रवाही झाल्या. गायत्री गुप्तपणे वाहू लागली. ब्रह्माची कोयना नदी, विष्णूची मी कृष्णा आणि शिवाची वेण्णा नदी झाली. आम्ही तिन्ही नद्या पूर्वेकडे प्रवाही झालो, आम्हा पाच नद्यांना पंचगंगा म्हणून ओळखू लागले. महाबळेश्वर या सह्याद्रीच्या पवित्र शिखरावरच्या माझ्या जन्माची ही पुराणकथा!