

Immanuel Kant Peace Philosophy
esakal
धर्माच्या क्षेत्रात स्वतः येशू आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात कांट यांना ‘Prince of Peace’ म्हणायला हरकत नसावी. अर्थात, येशूचे क्षेत्र धर्म हे असल्यामुळे त्याचा प्रभाव जितका पडला तितका तत्त्वज्ञान ज्याचे क्षेत्र होते, त्या कांटचा पडणे शक्यच नव्हते; परंतु जेव्हा-जेव्हा शाश्वत शांतीचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा-तेव्हा कांटचा आधार घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही हे वास्तव नाकारता येणार नाही.
आजची पाश्चात्त्य-युरोपीय संस्कृती ही ग्रीक, रोमन आणि ख्रिस्ती यांच्या विचारसंकरातून घडली आहे हे सर्वज्ञातच आहे. ग्रीकांचे विज्ञान-तत्त्वज्ञान, रोमनांचा कायदा-राजकारण आणि ख्रिस्ती धर्म हे तिचे अविभाज्य घटक होत. या संदर्भात एका खुलाशाची भर टाकायला हवी. जेव्हा आपण ख्रिस्ती धर्माचा संदर्भ घेतो, तेव्हा त्यात ख्रिस्तपूर्व ज्यू किंवा यहुदी परंपरेचाही समावेश करावा लागतो. साधारणपणे ख्रिस्ती धर्माला प्रमाण म्हणून मान्य असलेल्या पवित्र ग्रंथाची (बायबलची) चर्चा होत असते, तेव्हा त्यात स्वतः येशूच्या ‘नव्या करारा’बरोबर यहुदी धर्माच्या ‘जुन्या करारा’चा संदर्भ अनुस्यूत असतो.
यहुदी परंपरेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेषित किंवा प्रॉफेट (Prophet). यहुद्यांच्या मूळ हिब्रू भाषेतील ग्रंथात अशा अनेक प्रेषितांचे उल्लेख आढळतात. हे प्रॉफेट साक्षात परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी पाठवलेले असतात. ते ईश्वराचे संदेशवाहक असतात. म्हणून तर मराठी भाषेत त्यांच्यासाठी ‘संदेष्टा’ हा आणखी एक शब्द प्रचलित झालेला आहे. संदेष्ट्यांच्या अंगात जणू दैवी शक्तीचा संचार होता व त्यामुळे ते जी भाकिते करतात, ती पुढे जाऊन सत्य ठरतात, असे मानले जाते. अशाच एका यहुदी संदेष्ट्याने भविष्यातील येशूच्या जन्माचे व कार्याचे भाकीत केले होते. त्याचे नाव इसाया (Isaiah). यहुदी धर्मग्रंथामध्ये (७.१४) हे भाकीत आढळते. मुख्य म्हणजे त्यात या भावी अवतारासाठी ‘Immanuel’ हे विशेषणवजा नाव वापरण्यात आले आहे ते वर्णनात्मक मानावे.