नरेंद्र जोशी
राज्यातील प्रमुख शहरांमधील जुन्या सोसायट्यांचा पुनर्विकास हा केवळ इमारती नव्हे, तर शहरांचे भविष्य घडवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मोठ्या संख्येने इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असल्या, तरी प्रत्यक्षात सुरू झालेल्या प्रकल्पांची संख्या अजूनही कमी आहे.
प्रत्येक पिढीबरोबरच जीवनशैलीही बदलते असं म्हणतात. घरांच्या बाबतीतही तेच झालंय. पुढच्या पिढीची गरज, जीवनशैली आणि क्रयशक्ती यांनुसार घरांचं क्षेत्रफळ, रचना, आकर्षकता यामध्ये लक्षणीय बदल घडून आले अाहेत. चाळी, वाडे पाडून बांधलेल्या इमारती या बदलाची प्रचिती देतात. एकेकाळी केवळ वास्तू स्वच्छ राहावी, वावर राहावा, माणसांचा राबता राहावा, तसेच उत्पन्नाचे आणखी साधन या उद्देशाने वास्तू भाड्यानेही दिली जायची... आज त्याच घरांसाठी लाखो रुपयांहून अधिक अनामत आणि काही हजार रुपयांत मासिक भाडे मोजावे लागते आहे. त्यावरून घरांच्या अर्थकारणाचा हा प्रवास सहजी लक्षात येईल.
कोणत्याही शहराच्या वास्तुविश्वात होणारा बदल किंवा विकास ही खरंतर निरंतर चालणारी प्रक्रिया असते. वाडे, बंगले आणि सोसायट्यांच्या जागी नवीन सर्व सोयींनी युक्त अशा इमारती उभ्या राहणे हा पहिला विकास झाला. त्यासाठी कोणत्या शहराचा वा कोणत्या महानगराचा वेगळा उल्लेख वा उदाहरण गरजेचे नाही. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर यांसह राज्यातील इतर शहरांमध्येही साधारणपणे हीच परिस्थिती पाहायला मिळते.