प्रा. विश्वास वसेकर
भारतामध्ये प्राचीन काळापासून कोणतेही धार्मिक विधी किंवा इतर व्यवसाय यांच्यासाठी शुभ दिवस आणि शुभ वेळ पाहण्याची प्रथा रूढ आहे. कोणत्याही कामासाठी योग्य असा काळ म्हणजे मुहूर्त. ‘मुहूर्त’ हा संस्कृतातून मराठीत आलेला तत्सम शब्द आहे. शब्दकोशात या शब्दाचा अर्थ ‘दोन घटकांचा काळ' किंवा 'शुभवेळा' असा दिलेला आहे. हा एक लहानसा कालखंड असतो. एक मुहूर्त म्हणजे दिवसाचा ३० वा भाग किंवा ४८ मिनिटे. दिवसाचे पंधरा व रात्रीचे पंधरा असे अहोरात्रीचे ३० मुहूर्त होत.