निखिल चितळे
आपल्या राज्याची दूधपरंपरा आणि दुग्ध उद्योगाचा इतिहास समृद्ध आहे. भारतातील ‘पांढरी क्रांती’ ही केवळ दुग्ध उत्पादनाची क्रांती नव्हती, तर ती ग्रामीण भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आणि पोषणदृष्ट्या समृद्ध करणारी क्रांती होती. या क्रांतीने लाखो कुटुंबांचे जीवनमान उंचावले आणि भारताला जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश केले.
सन १९७०च्या दशकात भारतात दुग्धक्रांतीचा आरंभ झाला. या क्रांतीने देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. महाराष्ट्रातही या काळात दुग्ध व्यवसायात मोठी वाढ झाली. पूर्वी गावोगावी दूध मोकळ्या स्वरूपात विकले जात असे. त्यात भेसळ असण्याची शक्यता, आरोग्याच्या समस्या आणि वाहतुकीच्या अडचणी होत्या.
हळूहळू पाश्चरायझेशन तंत्रज्ञान आणि शीतसाखळी विकसित झाल्यामुळे दूध पिशवीत विकले जाऊ लागले. पॅकेजिंगमुळे दूध शुद्ध, सुरक्षित आणि टिकाऊ झाले. या बदलाने ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढवला.