Delhi pollution
Esakal
प्रदूषणाची समस्या ‘जागतिक’ असली, तरी ती भारतासारख्या विकसनशील देशांना अधिक ग्रासते आहे आणि दिल्ली, मुंबई, कोलकाता व पुण्यासारखी शहरे आता त्यात होरपळून निघत आहेत. प्रदूषणाच्या प्रकारांत हवा-पाणी यांचा प्रमुख समावेश असून, त्यातही आता हवा प्रदूषणाच्या बाबतीत दिल्ली तसेच मुंबई आणि देशातील अन्य शहरांसमोर ‘न भुतो न भविष्यती’ अशी समस्या उभी ठाकली आहे.
आधीच पाणी प्रदूषणाच्या बाबतीत देश झुंजत असताना आता हवा प्रदूषणाच्या बाबतीत देशाची राजधानी मोठ्या संकटाला सामोरी जात आहे. श्वास घ्यायला त्रास होत असल्याची तक्रार सगळेजण करत आहेत, त्यात देशातील या महत्त्वाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या आजाराचा उल्लेख करत प्रदूषणाच्या समस्येकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. नेमके त्याचवेळी दिल्लीतील न्यायालयाने एका याचिकेवर भाष्य करताना सरकारला ‘एअर प्युरिफायर’वरील जीएसटी कमी करायचा सल्ला दिल्याने या प्रकरणाचे गांभीर्य सगळ्यांच्याच लक्षात आले व त्याची चर्चा वाढली.