

Easy Fusion Potato Dishes for Kids
esakal
नेहा काडगांवकर
साध्या बटाट्यालाही थोडासा कॉन्टिनेंटल टच दिला, की त्याची चव एकदम खास होते. चीज, हर्ब्स आणि मसाल्यांच्या संगतीत तयार होणाऱ्या या रेसिपीज घरच्या साध्या मेनूलाही एक वेगळीच टेस्ट देतात. झटपट होणाऱ्या आणि तितक्याच यमी अशा बटाट्याच्या या कॉन्टिनेंटल पदार्थांची चव प्रत्येकाला हवीहवीशी वाटू शकते.
वाढप
४ व्यक्तींसाठी
साहित्य
तीन मोठे बटाटे, १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा,
२ टेबलस्पून तांदळाचे पीठ, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा टीस्पून जिरे, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, तव्यावर शेकण्यासाठी तेल किंवा बटर.
कृती
बटाटे सोलून, किसून घ्यावेत व थोडावेळ पाण्यात ठेवावेत. अतिरिक्त पाणी हलकेच पिळून काढावे. आता एका भांड्यात किसलेले बटाटे, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरे एकत्र करून घ्यावे. मग त्यात तांदळाचे पीठ, मीठ व काळी मिरी पूड घालून हे मिश्रण एकजीव करावे. त्यानंतर तवा गरम करून त्यावर थोडे तेल किंवा बटर लावावे. तयार मिश्रणाचे छोटे गोळे तव्यावर पसरून त्यांना गोल आकार द्यावा. ते दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यावेत. गरमागरम पोटॅटो पॅनकेक्स टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करावेत.
टीप
पोटॅटो पॅनकेक्स ही एक कुरकुरीत आणि चविष्ट स्नॅक डिश आहे. ही मुख्यतः युरोपीय पाककलेतून आली आहे. पोटॅटो पॅनकेक्स बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतात, त्यामुळे त्यांना खूप छान टेक्स्चर मिळते. ही डिश ब्रेकफास्ट, स्नॅक किंवा हलके मील म्हणून दिली जाते. टोमॅटो सॉस, दही किंवा विविध चटण्यांसोबत सर्व्ह केली जाते. साधी सामग्री आणि झटपट तयार होणारी असल्यामुळे ही डिश घरगुती तसेच पार्टी स्नॅक म्हणूनही लोकप्रिय आहे.