

women in Indian cinema
esakal
एकीकडे लोकप्रिय मुख्य धारेत रोमँटिक राजेश खन्ना, अँग्री यंग मॅन अमिताभ यांच्या छायेत सिनेमातली ‘स्त्री’ मनोरंजनाची आणि तोंडी लावण्याची वस्तू म्हणून घुसमटत राहिली, तर दुसरीकडे ७०चं दशक हे स्त्री चळवळींच्याही आरंभाचं दशक होतं आणि त्याचा प्रभाव समांतर सिनेमातील स्त्री-चित्रणावर झाला. श्याम बेनेगल यांचा स्त्रीप्रधान सिनेमा हे फार महत्त्वाचं घटित...
स्त्रीवादी किंवा स्त्रीकेंद्रित चित्रपटांचा विचार केला जाऊ लागला, तो स्त्रीमुक्ती, स्त्रीची अस्मिता या सगळ्याच सामाजिक जाणिवेच्या पृष्ठभूमीवर जाण येऊ लागल्यानंतर. परंतु, ११३ वर्षांच्या भारतीय सिनेमाच्या इतिहासात वेळोवेळी स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून केलेले चित्रपट येत होते. फरक हा, की सुरुवातीच्या मोठ्या कालखंडातला पुरुषप्रधान भारतीय समाज, स्त्रीविषयक धारणा पक्क्या धरून ठेवणारा असल्यानं भारतीय सिनेमानंही तोच पायंडा सुरू ठेवला. परंपराशरण स्त्रीचीही त्याला संमतीच होती. लोकांना ‘सिनेमा’ या नव्या माध्यमाची सवय होईपर्यंत, लोकांच्या परिचयाच्या पुराणातल्या कथांवर चित्रपट तयार केले जात होते. पुराणातल्या स्त्रीचं जे रूप, तेच स्वाभाविकपणे चित्रपटात अवतरणार. हे रूप होतं पतिव्रता, सोशिक, त्यागमूर्ती स्त्रीचं. भारताच्या पहिल्याच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखा होती हरिश्चंद्राची पत्नी ‘तारामती’. ही गोष्टच मोठी बोलकी आहे. इथून पुढे सती सावित्री, सीता अशा सोशिक, त्यागी पतिव्रता पडद्यावर येत राहिल्या. ‘त्याच्या’साठी जगणारी, ‘त्याच्या’साठी मरणारी ‘ती’ या चित्रपटाची नायिका. कर्ता तो, सोसणारी ती. अपवाद वाडिया ब्रदर्सच्या स्टंटपटांची नायिका फिअरलेस नादिया. ती सोसायची नाही. चोपायची.