आर. एन. शिंदे
भारतीय अन्नप्रक्रिया उद्योग फक्त उद्योग नसून, तो शेतकरी, उद्योजक, तंत्रज्ञ आणि ग्राहक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. पालेभाज्यांपासून ‘रेडी टू ईट’पर्यंत आणि स्थानिक बाजारातून जागतिक बाजारपेठेपर्यंतचा हा प्रवास ‘फ्रोझन फ्युचर’कडे वेगाने वाटचाल करतो आहे. सुसंघटित धोरण, नवविचार आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय अन्नप्रक्रिया उद्योगाला जागतिक ‘फूड सुपरपॉवर’ करण्याची संधी आज उपलब्ध आहे. पण, आपण त्याचा कसा उपयोग करतो, हा प्रश्न आहे.
भारतात अन्नप्रक्रिया उद्योगाच्या वेगाने विस्तारत असलेल्या उपशाखांमध्ये फ्रोझन फूड हे क्षेत्र विशेष महत्त्वाचे ठरते आहे. विशेषतः पालेभाज्यांचे उत्पादन जास्त असलेल्या राज्यांमध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, कर्नाटक येथे फ्रोझन पद्धतीने पालेभाज्या प्रक्रिया करण्याकडे कल वाढू लागला आहे.
पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू यांसारख्या भाज्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. ही उत्पादने ताजी असतानाच निवडली जातात, स्वच्छ केली जातात, नंतर उकळत्या पाण्यात काही सेकंद ब्लांच करून लगेच थंड केली जातात आणि मग उणे तापमानात फ्रीझ केली जातात. या प्रक्रियेला इंडिव्हिज्युअल क्विक फ्रिझिंग - आयक्यूएफ (Individual Quick Freezing) म्हणतात. या प्रोसेसमध्ये या भाज्यांमधील रंग, चव, पोषणमूल्य टिकून राहते आणि त्यांचे शेल्फलाइफ ८ ते १२ महिने असते.