

Indian Stock Market Outlook
esakal
भूषण महाजन
नुकताच बाजाराने ऑप्शन्स आणि फ्युचरवरील एसटीटी व त्यापाठोपाठ शेअरविक्रीतून झालेल्या नफ्यावरील वाढवलेला कर पचवला होता. स्थानिक गुंतवणूकदार ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ या वर्गात मोडतो. पण परदेशी संस्थांचे तसे नाही. त्यांना इतर देशांत आहेत तसेच कर हवेत. नसल्यास ते येत नाहीत. नुकताच यूपीआयवर लादलेला एमडीआर हा असाच अंधारात केलेला वार होता.
पानिपत संग्रामाच्या पूर्वसंध्येला बुराडी घाटावर जखमी अवस्थेत असताना कुतुबशहाने दत्ताजी शिंद्यांना विचारले, ‘‘क्यों पाटील, और लढोगे?’’ त्यावर दत्ताजींनी दिलेले ‘‘क्यूँ नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे!’’ हे उत्तर इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. याच शीर्षकाचा एक लेख मी मागील मंदीत गुंतवणूकदारांना धीर देण्यास लिहिला होता. आज पुन्हा एकदा बाजार त्याच वळणावर उभा आहे. मी आता वरील उत्तरात काही बदल केले आहेत. कारण आज नाही तर काही दिवसांनी, पण शेअर बाजार वर जाणारच आहे. आपण वाचणारच आहोत आणि लढत मंदीवर विजय मिळवणारच आहोत.
आम्ही गेली दोन वर्षे तक्रार करीत होतो, की प्रमुख कंपन्यांचे निकाल विक्री आणि नफ्यात मोठी वृद्धी दाखवत नाहीत, त्यामुळे आपल्या बाजाराचे खास आकर्षण उरले नाही. तसेच आपल्या व अमेरिकेच्या व्याजदरात फारसा फरक नाही. त्यामुळे इक्विटी आणि रोखेबाजार दोन्हींकडे नवा भांडवल ओघ येत नाही. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही.