अर्थविशेष । भूषण महाजन
सारेच विश्लेषक भारतीय बाजार फार महाग आहेत असे म्हणतात, पण आपला बाजार स्वस्त कधी होता? त्याचे उत्तर असे, की गेल्या पाच वर्षांत फक्त कोविडदरम्यान आपला शेअर बाजार अत्यंत आकर्षक मूल्यांकनावर होता. मग पुन्हा कोविड यायची वाट पाहत बसायचे का? आजही निर्देशांकाकडे काणाडोळा करून एकेक शेअरचा अभ्यास केला, तर अनेक संधी दिसतील.
लहान मुलांचा पकडापकडीचा खेळ अगदी रंगात आला असताना, थकून आउट व्हायच्या बेतात असताना कुणा चलाख मुलाने ओरडून टाइम प्लीज म्हणावे आणि श्वास घ्यायला थोडा वेळ मिळवावा किंवा एखादी टेस्ट मॅच रंगात यावी, आपली टीम जिंकायच्या बेतात असताना अचानक पाऊस पडावा आणि खेळ थांबावा तसे बाजाराचे झाले आहे. खेळ पुढे न्यायला त्याला थोडा वेळ हवा आहे. त्यातूनच हळूच शेअर बाजार खुणावतोय... टाइम प्लीज!